Latest

Vladimir Putin : रशियात पुन्हा ‘पुतिन’ सरकार

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा एकदा मोठा विजय मिळवला आहे. पुतिन यांनी सुमारे ८८ टक्के मतांनी विक्रमी विजय मिळवून सत्तेवर त्यांची आधीची घट्ट पकड मजबूत केली. पुतिन हे पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. १९९९ पासून रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून ते सत्तेवर आहेत.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे बोरिस येल्तसिन यांनी १९९९ मध्ये रशियाची सत्ता व्लादिमीर पुतिन यांच्याकडे सोपवली. त्यानंतर त्यांनी एकही निवडणूक हरलेली नाही. या विजयासह पुतिन यांना ६ वर्षांचा नवीन कार्यकाळ मिळाला आहे. रशियामध्ये सर्वाधिक काळ सत्तेत राहण्याच्या बाबतीत त्यांनी जोसेफ स्टॅलिन यांना मागे टाकले आहे. रशियाचे सर्वात जास्त काळ राष्ट्रप्रमुख राहण्याचा विक्रम पुतिन यांच्या नावावर आहे.

रशियामध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय निवडणुका अत्यंत नियंत्रित वातावरणात पार पडल्या. पुतिन यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी ॲलेक्सी नवलनी यांचा गेल्या महिन्यात आर्क्टिक तुरुंगात मृत्यू झाला. त्यांचे इतर विरोधक तुरुंगात आहेत. पुतिन यांच्या विरोधात तीन प्रतिस्पर्ध्यांनी निवडणूक लढवली. मात्र तिघांनीही पुतिन यांच्या २४ वर्षांच्या राजवटीवर किंवा युक्रेनविरुद्ध केलेल्या लष्करी कारवाईवर टीका करणे टाळले होते.

रशियाच्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ८० लाखांहून अधिक मतदारांनी ऑनलाइन मतदान केले. रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदानाचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुतिन यांनी मॉस्कोमधील विजयी भाषणात समर्थकांना सांगितले की, "ते युक्रेनमध्ये रशियाचे विशेष लष्करी ऑपरेशन म्हणून संबोधित केलेल्या कामांशी संबंधित निराकरणास प्राधान्य देतील आणि रशियन सैन्य मजबूत करतील." पुतीन पुढे म्हणाले, "आमच्यासमोर अनेक कामे आहेत. आम्हाला धमकावण्याचा, दडपून टाकण्याचा प्रयत्न करणारे इतिहासात कधीही यशस्वी झाले नाहीत. भविष्यातही कधी यशस्वी होणार नाहीत," असे ते म्हणाले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT