Latest

Vivah Muhurat 2023 | लग्नाळूंसाठी आनंदाची बातमी! तुलसी विवाहानंतर ३ तर डिसेंबरमध्ये १० मुहूर्तांचा धडाका

मोहन कारंडे

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : तुलसी विवाहाच्या व्रताने कन्यादानाचे फळ मिळते, अशी धारणा आहे. तुलसी विवाहादिवशी खऱ्या अर्थाने दिवाळी संपते असे मानले जाते. २४ नोव्हेंबरला तुलसी विवाहाचा सोहळा होत असून यानंतर लग्नाचे मुहूर्त काढण्यात येतात. यंदा नोव्हेंबर महिन्यात तीन मुहूर्त असून अनेक घरांत लगीनघाई सुरू झाली आहे, तर डिसेंबर महिन्यात १० मुहूर्तांचा धडाका उडणार आहे. (Vivah Muhurat 2023)

तुलसी विवाह कार्तिक शुद्ध एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत केले जातात. आश्विन व कार्तिक हे शरद ऋतूचे दोन महिने संपत आले की हेमंत ऋतूची चाहूल लागते. यासोबतच विवाहाचे मुहूर्त सुरू होण्याचे वेध लागतात. तुळशीचे बाळकृष्णासोबत लग्न लावण्याचा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.

तुलसी विवाह सोहळा कार्तिक एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत सायंकाळच्यावेळेत करण्यात येतो. घरातील तुलसी वृंदावनाची किंवा कुंडीला रंग, फुलांची आरास केली जाते. घरची मुलगी असावी अशा पद्धतीने तिच्या विवाहाची तयारी केली जाते. अंतरपाट, अक्षता, मंगलाष्टक, तोरण व मांडव म्हणून उसाची धाटे असे सजवले जाते. मुहूर्तानुसार बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट पकडून हा विवाह होतो. यानंतर प्रसाद, फराळचे वाटप उपस्थितांना करण्यात येते. तुलसी विवाहानंतर लग्नाचे मुहूर्त असल्याने अनेक घरांमध्ये लगबग सुरू आहे. नोव्हेंबर महिन्यात तुलसी लग्नानंतर लगेचच २७, २८ आणि २९ नोव्हेंबरला तीन मुहूर्त आहेत. तर डिसेंबर महिन्यातील ६, ७, ८ या सलग मुहूर्तामुळे शहरातील बहुतांश कार्यालये बुक झाली आहेत. यानंतर १५,१७, २०, २१, २५, २६, ३१ असे मुहूर्त चालू वर्षात आहेत. (Vivah Muhurat 2023)

नोव्हेंबर : २७, २८ व २९ डिसेंबर : ६, ७, ८, १५, १७, २०, २१, २५, २६, ३१

SCROLL FOR NEXT