Latest

भक्तिरसात तल्लीन करणारा ‘विठ्ठल माझा सोबती’ २३ जूनपासून भेटीला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'विठू माऊली तू, माऊली जगाची…' गात-गुणगुणत मोठ्या भक्तिभावाने महाराष्ट्रातील लाखो भाविक आषाढी एकादशीला आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या भेटीस येत असतात. रात्रंदिन अविरत टाळ-मृदुंगाच्या तालावर तुळशी वृंदावन आणि पालखी नाचवत भक्तिरसात तल्लीन; विठ्ठलाच्या एका भेटीसाठी आसुसलेली, ही भक्तमंडळी असं प्रसन्न चित्र सध्या आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतंय. त्यात दुग्धशर्करा योग म्हणजे विठू नामाचा गजर करणारा 'विठ्ठल माझा सोबती' हा चित्रपट भाविकांच्या भेटीस आला आहे.
फक्त मराठी आणि नाईंटी नाईन प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने 'विठ्ठल माझा सोबती' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून हा चित्रपट येत्या २३ जूनला प्रदर्शित होणार आहे.

विठ्ठल जीवाचा जिव्हाळा। विठ्ठल कृपेचा कोंवळा ।
विठ्ठल प्रेमाचा पुतळा। लावियेलें चाळा । विश्व विठ्ठलें ॥  

तुकाराम गाथेमधील या अभंगाचा साक्षात्कार घडवणारा 'विठ्ठल माझा सोबती' हा चित्रपट पांडुरंगाच्या एका निस्सीम भक्तावर आधारित आहे. ही कथा एका श्रीमंत कुटुंबात घडते. जिथे पैसा आहे पण नात्यांत गोडवा नाही. अशातच कुटुंबकलहाला कंटाळलेल्या त्या भक्ताच्या आयुष्यात एक साधारण 'विठ्ठल' नामक मदतनीस येतो. 'विठ्ठल'च्या येण्याने नेमकी काय जादू घडते?, त्या भक्ताच्या घरातील सदस्यांमधील मतभेद दूर होतात का?, हा 'विठ्ठल' नेमका आहे तरी कोण आणि कुठून आला? या आणि अशा रंजक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी 'विठ्ठल माझा सोबती' पाहायलाच हवा.

पल्लवी मळेकर (फक्त मराठी) निर्मित आणि संदीप मनोहर नवरे' दिग्दर्शित 'विठ्ठल माझा सोबती' या चित्रपटात अरुण नलावडे, संदीप पाठक, राजेंद्र शिरसाटकर, आशय कुलकर्णी, अश्विनी कुलकर्णी, दिव्या पुगांवकर, अभय राणे यांसारख्या दर्जेदार कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळतील. या चित्रपटाची उत्कंठावर्धक कथा संदीप मनोहर नवरे यांनी लिहिली असून पटकथा-संवाद विक्रम एडके यांचे आहेत. गौरव चाटी आणि गणेश सुर्वे यांचं सुमधुर संगीत या चित्रपटाला लाभलं आहे.

SCROLL FOR NEXT