Latest

विराट कोहली- बापमाणूस..!

Arun Patil

आपल्या देशात लोकप्रिय असलेला स्टार क्रिकेटपटू विराट कोहली नुकताच दुसर्‍यांदा बाप झाला आहे. भारताची लोकसंख्या पाहता कुणाचे बाप होण्याचे काही कौतुक असावे असा प्रकार नाही; परंतु विराट कोहलीचे पितृत्व सध्या देशभर गाजत आहे. भारतीय संघाचा प्रमुख आधारस्तंभ असलेला हा खेळाडू सध्या पितृत्वाची रजा घेऊन काही महिने घरीच बसणार आहे. साहजिकच लोकांमध्ये ओरड सुरू झाली की, देशाचे प्रतिनिधित्व करणे जास्त महत्त्वाचे आहे की त्याचे दुसर्‍यांदा बाप होणे जास्त महत्त्वाचे आहे?

शासकीय कर्मचार्‍यांना आणि जवळपास सर्व खासगी कंपन्यांमध्ये किमान तीन महिन्यांची मातृत्व रजा मातेला दिली जाते. त्याचबरोबर कमी-जास्त प्रमाणात दोन आठवड्यांची किंवा महिनाभराची पितृत्वाची रजा पुरुष कर्मचार्‍यांना पण मिळत असते. आता आपल्या बायकोची किती काळ काळजी घ्यायची आणि नवजात मुलासाठी किती वेळ द्यायचा, हे ज्या त्या जोडप्याने ठरवायचे असते. समजा, विराट कोहलीने तीन महिने बाळ-बाळांतीण सांभाळायचे असे ठरवले असेल तर तो त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे.

मीडियामध्ये त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. कोहलीने विचार केला असेल की, क्रिकेट काय, आयुष्यभर खेळायचेच आहे आणि पैसा-पैसा तरी किती करायचा? एका जन्मात दररोज कोट्यवधी रुपये खर्च केले तरी खर्च होणार नाहीत इतकी संपत्ती विराट आणि त्याचबरोबर तेवढीच लोकप्रिय असलेली अभिनेत्री पत्नी अनुष्का यांनी जमवली आहेच. अपत्य संख्या कमी झाल्यामुळे बायकोची बाळंतपणे होणारच किती? एक किंवा दोन. पैसा काय, कधीही मिळवता येईल. क्रिकेट काय. कधीही खेळता येईल; पण पुन्हा-पुन्हा बाप होण्याचा योग येत नाही म्हणून विराटने पितृत्व रजा घेतली असेल तर त्यात काही चूक नाही.

कुणी कोणताही निर्णय घेतला तरी त्याच्या बाजूने आणि विरुद्ध बोलणारे दोन्ही प्रकारचे बोलघेवडे लोक आपल्या देशात भरपूर आहेत. विराटने देशाचे प्रतिनिधित्व करण्याला प्राधान्य द्यायला पाहिजे होते, असे असंख्य लोकांचे म्हणणे आहे, तर विराटने पितृत्वाची रजा घेतली हे चांगलेच केले, असे काही लोकांचे मत आहे. ते जे काही असेल ते असो; परंतु आपल्या व्यक्तिगत आयुष्याचा निर्णय घेण्याचीसुद्धा मुभा या सेलिब्रिटी म्हणून ओळखल्या जाणार्‍या लोकांना नसते, हे तुमच्या लक्षात येईल.

तसे पाहायला गेले तर स्त्रियांच्या बाळंतपणामध्ये पुरुषांचा रोल फक्त मानसिक आधाराचा असतो. बाळंतपणापूर्वी दवाखान्यात अ‍ॅडमिट करणे आणि डॉक्टर लोक काय करत आहेत, ते पाहत राहणे एवढेच त्यांचे काम असते. मातृत्वाच्या वेदना स्त्रीलाच सहन कराव्या लागतात. आजकाल नॉर्मल डिलिव्हरी हा प्रकार अत्यंत दुर्मीळ होत चालला आहे. कुठली रिस्क नको म्हणून पोटावर एक काप घेऊन अलगद बाळ बाहेर काढून आईच्या हातात ठेवले जाते. अशावेळी ऑपरेशन थिएटरच्या किंवा प्रसूतिगृहाच्या बाहेर अस्वस्थपणे येरझार्‍या घालणारा पती नेहमीच पाहायला मिळतो.

SCROLL FOR NEXT