Latest

Virat Kohli : टी-20 मध्ये कोहली चौथ्या क्रमांकावर, 346 डावांत फटकावल्या 11490 धावा

रणजित गायकवाड

बंगळूर, वृत्तसंस्था : आयपीएल 2023 च्या 15 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध एक विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना खेचला आणि लखनौने अवघड वाटणारा विजय खेचून आणला. या सामन्यात आरसीबीचा संघ भलेही हरला असेल; पण अनुभवी फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत विराट आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या पहिल्याच षटकापासून विराट कोहली (Virat Kohli) जबरदस्त फॉर्ममध्ये होता. या सामन्यात त्याने 44 चेंडूंत 4 षटकार आणि तब्बल 6 चौकारांच्या मदतीने 61 धावा केल्या. कोहलीने आपल्या खेळाच्या जोरावर टी-20 क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचला आहे. टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत विराट आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

या यादीत विराटने अलीकडेच अ‍ॅरॉन फिंचला मागे टाकले आहे. विराटने (Virat Kohli) आता 363 सामन्यांच्या 346 डावांमध्ये 11490 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटमधून 6 शतके झळकली आहेत, तर त्याने 87 अर्धशतके केली आहेत.

या यादीत अव्वल स्थानावर वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेल आहे. गेलने 455 डावांत 14562 धावा केल्या आहेत. त्याचवेळी पाकिस्तानच्या शोएब मलिकचे नाव दुसर्‍या क्रमांकावर येते. मलिकने 474 डावांत 12528 धावा केल्या आहेत.

या यादीत वेस्ट इंडिजचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डचे नाव तिसर्‍या क्रमांकावर आहे. पोलार्डने 55 डावांत 12175 धावा केल्या आहेत. त्याचवेळी चौथ्या क्रमांकावर असलेल्या कोहलीनंतर पाचव्या क्रमांकावर अ‍ॅरॉन फिंचचे नाव येते. फिंचने 376 डावांत 11392 धावा केल्या आहेत. याशिवाय सहाव्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर हा त्याचा एकमेव जोडीदार आहे. वॉर्नरने 11337 धावा केल्या आहेत. दुसरीकडे लखनौ संघाविरुद्ध 61 धावा करून विराट कोहली आयपीएलमध्ये सर्व संघांविरुद्ध अर्धशतक झळकावणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्यांच्या आधी ऋतुराज गायकवाड यांनी हा पराक्रम केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT