पुढारी ऑनलाईन: भारत आणि न्यूझीलंड मालिका अंपायरिंगसाठी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी अंपायरिंग विराट कोहलीच्या विकेटमुळे चर्चेत आहे. एजाज पटेलच्या चेंडूवर कोहलीला एलबीडब्ल्यू घोषित करण्यात आले. कोहलीने डीआरएस घेतला, पण निर्णय त्यांच्या बाजूने लागला नाही. यावर कोहली खूप संतापलेला दिसत होता आणि रागाच्या भरात त्याने आपली बॅट सीमारेषेवर आपटली.
80 धावांच्या सलामीच्या भागीदारीनंतर भारताने त्याच धावसंख्येवर शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजाराच्या विकेट्स गमावल्या. यानंतर कर्णधार विराट कोहली क्रीझवर आला. विराट समोर एजाज पटेल गोलंदाजी करत होता. एजाजने एका चेंडूवर कोहलीविरुद्ध एलबीडब्ल्यूचे अपील केले. समोर उभे असलेले पंच अनिल चौधरी यांनी त्याला बाद घोषित केले.
यानंतर कोहलीने डीआरएस घेतला. रिप्लेमध्ये, चेंडू प्रथम बॅटला लागलेला दिसत होता, परंतु तिसऱ्या पंचाने तो थेट पॅडवर आदळल्याचे मानले. कोहलीला बाद घोषित करण्यात आले. या निर्णयामुळे कोहली चांगलाच संतापलेला दिसत होता. पॅव्हेलियनकडे जाताना असताना त्याने रागाने आपली बॅट सीमारेषेवर आपटली.
विराट कोहली त्याच्या कसोटी कारकिर्दीत १४व्यांदा शून्यावर बाद झाला. न्यूझीलंडविरुद्ध विराट पहिल्यादांच शून्यावर आऊट झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला पुजाराही शून्यावर बाद झाला. कसोटी सामन्यात शून्यावर आऊट होण्याची पुजाराची 10वी वेळ होती. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात तोही प्रथमच शून्यावर बाद झाला.
यापूर्वी 2014 आणि 2018 मध्ये दोन्ही फलंदाज एकाच कसोटी डावात बाद झाले होते. 2014 मध्ये इंग्लंडच्या ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीत जेव्हा हे घडले होते, तेव्हा त्या कसोटी भारताचा पराभव झाला होता. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियातील एमसीजी ग्राउंडवर असेच घडले होते, परंतु भारताने तो कसोटी सामना जिंकला होता.