Latest

Virat and Ishan Dance: विराट कोहली-ईशान किशनचा भन्नाट डान्स व्हायरल, श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर डीजेच्या तालावर थिरकले

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat and Ishan Dance : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि युवा यष्टीरक्षक इशान किशन यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते डिजेच्या तालावर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानातील आहे. या मैदानावर भारतीय संघाने 12 जानेवारीला म्हणजेच गुरुवारी श्रीलंकेचा 4 विकेटने पराभव केला होता. या निर्णायक विजयानंतर भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.

इशान किशन दुस-याही वनडे सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता, पण संघाच्या शानदार विजयानंतर तो खूप आनंदी होऊन नाचताना दिसला. त्याला विराटची तितकी मोलाची साथ मिळाली. दोघांनी डीजेच्या तालावर ठेका धरताच स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांनी एकच जल्लोष केला. चाहते टाळ्यांच्या गजरात या खेळाडूंना प्रोत्साहन देत होते. काही प्रेक्षकांनी इशान-विराटच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल केला. (Virat and Ishan Dance)

बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात किशनने विक्रमी द्विशतक झळकावले. त्यानंतर त्याला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत संधी मिळेल अशी अपेक्षा होती, पण रोहित शर्माने त्याच्यापेक्षा शुभमन गिलला पसंती दिली आणि सलामीसाठी त्याची निवड करण्यात आली. गिलने पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते, तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 21 धावांची खेळी केली. (Virat and Ishan Dance)

दुसऱ्या सामन्यात, श्रीलंकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 39.4 षटकात सर्व गडी गमावून 215 धावा केल्या, तर भारताने 6 विकेट गमावून 2019 धावा करून सामना जिंकला. या सामन्यात कुलदीप यादव आणि सिराज यांनी सर्वाधिक ३-३ बळी घेतले, तर केएल राहुलने फलंदाजीत कमाल केली. निर्णायक प्रसंगी राहुलने शानदार फलंदाजी करत नाबाद 64 धावांची खेळी करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

भारताने सलग दोन सामने जिंकून मालिका 2-0 अशी जिंकली आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना तिरुअनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून श्रीलंकेचा व्हाईट वॉश करण्याच्या ध्येयाने रोहित शर्माचा संघ मैदानात उतरेल. कोहलीने गुवाहाटीमध्ये शानदार शतक झळकावले होते, पण कोलकात्यात तो फलंदाजीत काही खास करू शकला नाही आणि केवळ 4 धावा करून बाद झाला.

SCROLL FOR NEXT