Latest

भाजप नेते विनोद तावडे यांना संघटनात्मक बढती, राष्ट्रीय महामंत्री पदाची जबाबदारी

रणजित गायकवाड

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

भाजप नेते, माजी मंत्री विनोद तावडे यांना संघटनात्मक बढती देण्यात आली आहे.हरियाणाचे प्रभारी तावडे यांना राष्ट्रीय महामंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या नवीन टीम मध्ये यापूर्वी त्यांच्याकडे राष्ट्रीय मंत्री म्हणून संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली होती. भाजप ने रविवारी संघटनेत राष्ट्रीय पातळीवर नवीन नियुक्त्या केल्या. या नियुक्तींनुसार नड्डा यांनी तावडे यांच्यासह शहजाद पुनावाला आणि भारती घोष यांची राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली. यासोबतच माजी राज्यसभा खासदार आर.के.सिन्हा यांचे पुत्र ऋतुराज सिन्हा यांना राष्ट्रीय मंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून भाजपमध्ये आलेल्या आशा लाकडा यांची राष्ट्रीय मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

येत्या वर्षभरात पाच राज्यात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक जवाबदार्यांचे वाटप करण्यात आल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रीय महामंत्री भूपेंद्र यादव यांना केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ठ करण्यात आल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर विनोद तावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोबतच पश्चिम बंगालच्या माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांना राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातून दुसरे राष्ट्रीय महामंत्री

भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यानंतर या पदावर नियुक्त होणारे विनोद तावडे हे महाराष्ट्रातील दुसरे नेते ठरले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी कार्यकर्ते असलेले तावडे संघाच्या मुशीत तयार झालेले भाजपाचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती.पंरतु, भाजपकडून त्यांचे पुर्नवसन केले जात आहे. तावडे यांनी विधानपरिषदेत विरोधी पक्षतेते पदाची धुरा सांभाळली आहे. फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते शिक्षणमंत्री होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT