Latest

हिंगोली : ग्रामस्थ आक्रमक, शिक्षकांच्या नियुक्‍तीची मागणी करत जिल्हा परिषदेतच भरवली शाळा (व्हिडिओ)

मोनिका क्षीरसागर

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : गोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत 549 विद्यार्थी असताना केवळ 5 शिक्षकच कार्यरत आहेत. इतर शिक्षकांच्या नियुक्तीसाठी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना घेऊन मंगळवारी (दि.13) दुपारी चक्क जिल्हा परिषद कार्यालयातच शाळा भरवली. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने यांनीही गावकर्‍यांची व विद्यार्थ्यांची अडचण जाणून घेत शिक्षकांच्या नियुक्तीचे आश्वासन दिले.

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या वर्गात 549 विद्यार्थी आहेत. या शाळेमध्ये इयत्ता पाचवीच्या तीन तुकड्या असून, त्यात 133 विद्यार्थी शिक्षण घेतात. तसेच इयत्ता सहावीच्या तीन तुकड्यांमधून 145, इयत्ता सातवीच्या तीन तुकड्यांमधून 134, इयत्ता आठवीच्या तीन तुकड्यांमधून 137 विद्यार्थी शिक्षण घेतात. दरम्यान, इयत्ता पाचवी वर्गासाठी पाच शिक्षकांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात 2 शिक्षक कार्यरत असून, शिक्षकांची 3 पदे रिक्त आहेत. तसेच इयत्ता सहावी ते आठवी वर्गासाठी 12 शिक्षक आवश्यक असतांना प्रत्यक्षात मात्र, 3 शिक्षकच कार्यरत आहेत आणि 9 शिक्षकांची पदे अद्याप रिक्त आहेत.

शिक्षकांची पदे कित्येक दिवस रिक्त असल्याने, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या ठिकाणी शिक्षकांची रिक्तपदे भरावीत या मागणीसाठी गावकर्‍यांनी वेळोवेळी शिक्षण विभागाकडे निवेदन दिले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. यानंतर गावकर्‍यांनी आज दुपारी विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषद गाठून त्या ठिकाणीच शाळा भरवली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर, माजी सभापती संजय देशमुख, माजी सभापती रुपाली पाटील गोरेगावकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विनायक भिसे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने यांची भेट घेण्यात आली. यावेळी शाळेतील शिक्षकांच्या रिक्तपदांचा मुद्दा मांडण्यात आला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता, पुढील दोन दिवसांत शाळेवर सात शिक्षक पाठविण्याचे आश्वासन दैने यांनी दिले. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी अनंतकुमार कुंभार, कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांची उपस्थिती होती. मुख्य कार्यकारी अधिकारी दैने यांच्या आश्वासनानंतर गावकरी व विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद कार्यालय सोडले.

SCROLL FOR NEXT