Latest

Vijay Diwas : …असे जिंकले बांगला देश युद्ध

अमृता चौगुले

भारतीय सैन्याच्या अतुल्य पराक्रमाची साहसी गाथा म्हणून 1971 च्या बांगला देश युद्धाकडे ( Vijay Diwas 2021 ) पाहावे लागेल. बांगला देशातील युद्ध आक्रमणशील, तर दुसर्‍या आघाड्यांवर संरक्षक स्वरूपाचे होते. वेळेला महत्त्व होते आणि त्याद‍ृष्टीने डावपेच आखण्यात आले होते. तिन्ही दिशांकडून बांगला देशात आगेकूच करण्याचे मार्ग ताब्यात घेणे, सरहद्दीवरील पाकिस्तानी सैन्याला पीछेहाट करण्याची व ढाका येथे एकत्रित होण्याची संधी मिळू न देणे, असे डावपेच वापरले गेले.

( Vijay Diwas 2021 ) 1970 च्या पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत पूर्व पाकिस्तानातील अवामी लीगने 169 मधील 167 जागा जिंकल्या व इस्लामाबादमधील संसदेत अवामी लीगचे बहुमत झाले. आवामी लीगचे नेते शेख मुजिबूर रहमान यांनी राष्ट्राध्यक्षांपुढे सरकार स्थापनेचा दावा सादर केला. झुल्फिकार अली भुट्टो यांनी मुजिबूर यांना पंतप्रधानपद देण्यास विरोध केला. राष्ट्राध्यक्ष याह्याखान यांनी पूर्व पाकिस्तानात सेनेला तैनात केले.

पूर्व पाकिस्तानात यानंतर सर्वत्र अटकसत्र व दडपशाही सुरू झाली. अवामी लीगवर बंदी घालण्यात आली. मुजिबूर रहमान यांना अटक करून पश्‍चिम पाकिस्तान त्यांची रवानगी झाली. पूर्व पाकिस्तानातील 40 लाखांचे शिरकाण करण्यात आले. त्यातले 30 लाख हिंदू होते. 27 मार्च 1971 रोजी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यानी पूर्व पाकिस्तानात चालू असलेल्या बांगला देशसाठीच्या स्वातंत्र्यलढ्याला ( Vijay Diwas 2021 ) पूर्ण पाठिंबा जाहीर केला. पाकिस्तानी सैन्याच्या अमानुष अत्याचारांमुळे निर्वासितांचे लोंढे भारतात येऊ लागले. तेव्हा त्यांना परत जाण्यासाठी वातावरण निर्माण करण्याच्या भारताच्या विनंत्या पाकिस्तानने धुडकावून लावल्या.

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांना तुम्ही युद्धाला तयार आहात का, असा प्रश्‍न विचारला होता. तेव्हा सॅम माणेकशॉ यांनी दिलेले उत्तर आजही स्मरणात आहे. सध्या 'आर्मर्ड डिव्हिजन' आणि 'इन्फन्ट्री डिव्हिजन्स' वेगवेगळ्या ठिकाणी तैनात आहेत. थोड्या दिवसांनी मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यावर नद्यांना पूर येऊ शकतो. युद्ध डिसेंबरच्या महिन्यात केले जावे. कारण, तोपर्यंत आपले रणगाडे, शस्त्रांची आणि दारूगोळ्याची निर्मिती केली जाईल. रस्ते बांधले जातील. चीन सीमेवरच्या सैन्याला परत आणता येईल आणि बंडखोरांविरुद्ध काम करणार्‍या सैन्याचासुद्धा वापर करत आक्रमक कारवाई करता येईल. अनेक तज्ज्ञांनी युद्ध लगेच सुरू करावे, असा सल्ला इंदिरा गांधी यांना दिला होता. परंतु, तसे न करण्यामागची कारणे समजल्यामुळे गांधींनी माणेकशॉ यांचा सल्ला मानला आणि डिसेंबरमध्ये युद्धाला परवानगी दिली.

युद्धाचे प्रमुख क्षेत्र जरी पूर्व पाकिस्तान असले, तरी त्याचे पडसाद पश्‍चिम सीमेवरही उमटणे साहजिकच होते. युद्धाच्या आरंभीच्या दोन महिन्यांत पाकिस्तानने भारताच्या हद्दीत असलेल्या बांगलादेशीय शरणार्थी वसाहतींवर तोफमारा करणे, खेडेगावांना आगी लावणे, माणसे पळविणे व घातपात करणे अशा कारवाया केल्या. 21 नोव्हेंबर रोजी कोलकाता-जेसोर (बांगला देश) मार्गावरील बोप्रा (प. बंगाल) गावावर पाकिस्तानी सैन्याने व विमानांनी हल्ला केला. प्रतिहल्ल्यात भारतीय सैन्याने त्यांचे 13 रणगाडे व तीन विमाने नष्ट केली. नोव्हेंबरअखेर हिल्ली गावावर पाकिस्तानने हल्ला केला. ही लढाई तीन दिवस चालली. दोन्ही पक्षांची जबर हानी झाली. पाकिस्तानी अतिक्रमणे बंद पाडण्यासाठी आंतरराष्ट्रीय हद्द ओलांडून प्रतिकार करण्याची सवलत सरकारने भारतीय सैन्याला दिली.

बांगला देशातील युद्ध आक्रमणशील, तर दुसर्‍या आघाड्यांवर संरक्षक स्वरूपाचे होते. तिन्ही दिशांकडून बांगला देशात आगेकूच करण्याचे मार्ग ताब्यात घेणे, सरहद्दीवरील पाकिस्तानी सैन्याला पीछेहाट करण्याची व ढाका येथे एकत्रित होण्याची संधी मिळू न देणे, असे डावपेच वापरले गेले. तैंगेलमध्ये झालेला भारतीय सैन्याचा 'एअर ड्रॉप', हेलिकॉप्टरच्या मदतीने बांगला देशमधल्या नद्या पार करणे, मोठ्या शहरांजवळ असलेल्या किल्ल्यांवर हल्ला न करता त्यांच्या मागे जाऊन त्यांचा परत जाण्याचा मार्ग अडवणे, सैन्याची हरकत करण्याकरिता घोडे, रिक्षा, बैलगाड्या अशा अनेक अभिनव वाहनांचा वापर झाला. ढाक्याच्या पूर्वेला मेघना, पश्‍चिमेला व दक्षिणेला जमुना-पद्मा आणि उत्तरेला नद्यांचे अडथळे असल्याने ढाका 'बेट दुर्ग' बनतो. या दुर्गाचा आश्रय घेऊन पाकिस्तानी सैन्याला अखेरची लढाई देणे अशक्य करणे, हे भारताचे लष्करी उद्दिष्ट होते.

युद्ध सुरू व्हायच्या आधी पूर्व पाकिस्तानमध्ये चार 'डिव्हिजन' सैन्य आणि एक लाखांहून जास्त 'पॅरामिलिटरी फोर्सेस' तैनात होते. तुलनेने भारतीय सैन्याच्या आठ 'डिव्हिजन' होत्या. म्हणजे आक्रमण करणारे भारतीय सैन्य आणि पाकिस्तानी सैन्य यांचा रेशो '2 : 1' असा होता. हल्ला करायचा असेल, तर तिप्पट किंवा सहापटीने सैन्याची गरज असते. युद्ध जिंकण्याकरिता नावीन्यपूर्ण डावपेच आणि युद्धाच्या पद्धती वापरल्या गेल्या. कारण, केवळ संख्याबळाच्या शक्‍तीवर युद्ध जिंकणे हे शक्य नव्हते. 'मुक्‍ती वाहिनी'चा वापर गुप्तहेर माहिती मिळवणे, शत्रूवर मागून हल्ले करणे याकरिता केला गेला. पहिल्या चार दिवसांमध्ये वायुदलाने पूर्व पाकिस्तानमधील वायुदल नष्ट केले आणि त्यानंतर पाकिस्तानचे वायुदल तिथे पुन्हा फिरकले नाही. भारतीय नौदलाने पूर्व पाकिस्तानच्या किनारपट्टीची नाकेबंदी करून पाकिस्तानी सैन्याचा पळून जाण्याचा रस्तादेखील पूर्णपणे बंद केला. 'स्पेशल फ्रंटियर फोर्स'ला चितगावच्या डोंगरांमध्ये 'हेली ड्रॉप' करून पाकिस्तानी सैन्याचा म्यानमारमध्ये जाण्याचा रस्तासुद्धा भारतीय सैन्याने बंद केला.

भारतीय भूदलाने अपेक्षेपेक्षाही अधिक वेगाने पूर्व पाकिस्तानमध्ये वाटचाल केली. शत्रूचे कच्चे दुवे हेरत व मोठा प्रतिकार शक्य असलेल्या ठिकाणी वळसा घालून भारतीय सेनेने पुढे वाटचाल केली. पूर्व पाकिस्तानात भारतीय सैन्याने चहुबाजूंनी चढाई केली. नैऋत्य भागात '2 कोअर'च्या (नेतृत्व जनरल रैना) नऊ 'इन्फन्ट्री डिव्हिजन'ने प्रथम जेस्सोर काबीज केले आणि नंतर खुलना बंदरापर्यंत आघाडी मारली. त्याच्या चार 'इन्फन्ट्री डिव्हिजन'ने झेनिदावर विजय मिळवल्यानंतर पद्मा नदीवरील महत्त्वाच्या होर्डिंग ब्रीजवर ताबा केला.वायव्य विभागात '33 कोअर'ने (नेतृत्व जनरल थापर) '20 माऊंटन डिव्हिजन' आणि '71 माऊंटन ब्रिगेड'करवी बोग्रा आणि रंगपूरमधील शत्रूसैन्याला पराजित केले. पूर्व विभागात '4 कोअर'च्या (जनरल सगत सिंग) 8, 57 आणि 23 'माऊंटन डिव्हिजन्स'नी मौलवीबजार, सिल्हेट, दाऊदखंडी आणि मैनामनी ही शहरे जिंकली.

मध्य विभागात '101 कम्युनिकेशन झोन'ने (नेतृत्व मेजर जनरल गिल आणि नंतर जनरल नागरा) जमालपूर, मैमेनसिंग आणि रंगेलचा एकामागून एक ताबा घेत पार ढाक्यापर्यंत मजल मारली. कोलकाता, सिलिगुडी, शिलाँग आणि त्रिपुरा या भारतातील शहरांमार्गे चारही दिशांनी हल्ला करून पूर्वेमधील पाकिस्तानी सैन्याची कोंडी झाल्यानंतर पूर्व पाकिस्तानातील सेनापती लेफ्टनंट जनरल निआझी याने अखेरीस शरणागती पत्करली. पंधरवड्याच्या आतच भारतीय सेनेने ढाका शहर काबीज केले. 93 हजारांहून अधिक पाकिस्तानी सैनिक युद्धबंदी झाले. 16 डिसेंबर रोजी पूर्व पाकिस्तानातील पाकिस्तानी सेना शरण आली. भारताचे चार हजार सैनिक या युद्धात कामी आले. पाकिस्तानी नऊ हजार सैनिक ठार, तर 25 हजार जखमी झाले आणि युद्धकैदींची संख्या 97,368 इतकी होती.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

SCROLL FOR NEXT