Latest

पुणे : दरडींचा धोका असलेल्या गावांवर ‘जागता पहारा’

अमृता चौगुले
पुणे : पुढारी वृत्तसेवा :  रायगड जिल्ह्यात इर्शाळवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने धोकादायक गावांमध्ये 'जागता पहारा' ठेवला आहे. प्रशासनातील संबंधित अधिकार्‍यांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सावधानतेच्या आणि संभाव्य उपाययोजनांबाबत सूचना दिल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून घाटमाथ्यावर संततधार पावसामुळे दरडींचा धोका असलेल्या गावांवर जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष दिले आहे. रायगड जिल्ह्यातील घटनेनंतर जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी गुरुवारी जिल्ह्यातील सर्व प्रांत, तहलसीलदार, जिल्हा परिषदेचे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी यांना यासंबधीचे आदेश दिले आहेत. तसेच जिल्ह्यात दरडीचा धोका असलेल्या तेवीस गावांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश ग्रामसेवक, मंडलाधिकारी, तलाठी यांना दिले आहेत..
धोकादायक गावांमध्ये बसविले रेनगेज
जिल्ह्यातील घाटमाथ्यावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होत असतो. सतंतधार पावसामुळे दरडींचा धोका निर्माण होतो. त्यामुळे या गावांमध्ये किती प्रमाणात पाऊस होतो, याची माहिती व्हावी यासाठी सर्व धोकादायक गावांमध्ये रेनगेज म्हणजेच पावसाची नोंद घेणारे यंत्र बसविण्यात आले आहे. त्यामधून किती पाऊस होतो आहे, याचा अंदाज घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत.
वरंधा घाट रस्ता पूर्णपणे बंद
 पंढरपूर- भोर- महाड राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 डीडीवरील भोर तालुक्याच्या हद्दीतील वरंधा घाट रस्ता पावसाळ्याच्या कालावधीत 22 जुलै ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत   अवजड वाहतुकीकरीता संपूर्णपणे बंद करण्याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केली आहे.
मढे घाट धबधबा परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
वेल्हा तालुक्यातील केळद-भोर्डी गावाच्या हद्दीतील मढे घाट धबधबा परिसरात प्रवाहित होणार्‍या धबधब्यामध्ये पर्यटकांना दोरखंडाद्वारे खाली सोडण्यास पुढील 60 दिवस प्रतिबंध घालण्याचे आदेश भोर उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र कचरे यांनी जारी केले आहे. हा परिसर पर्जन्यमानाचा प्रदेश असल्याने प्रवाहित होणार्‍या धबधब्यामध्ये काही संस्था, आयोजक हे पर्यटकांना प्रवाही धबधब्याच्या वरील भागातून खाली दरीमध्ये 200 ते 300 फुटांपर्यंत दोरखंडाद्वारे सोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. नियमभंग करणार्‍या आयोजक संस्था, सहभागी पर्यटकांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पाच गावांमधील लोकांना भरली धडकी
राज्यात सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाळ्यात दरडप्रवण क्षेत्रात 15-20 वर्षांत तळयीमाच, माळीण व इर्शाळवाडी दरड पडून मोठी जीवितहानी झाली आहे. माळीणची जखम शहारे आणणारी असताना आता रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत झालेल्या घटनेने आंबेगाव तालुक्यातील धोकादायक 5 गावांमधील लोकांना धडकी भरली असून, ते जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. माळीण घटनेच्या वेळी धोकादायक म्हणून जाहीर केलेल्या आंबेगाव तालुक्यातील काळवाडी (जांभोरी), बेंढारवाडी (पोखरी), मेघोली (माळीण), पसारवाडी आणि भगतवाडी (फुलवडे) या पाच गावांमध्ये अद्यापही संरक्षक उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.
पुनर्वसनाचे प्रस्ताव धूळ खात
माळीण दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये प्राथमिक माहिती नुसार 95 गावांमध्ये दरडीचा धोका असल्याचे समोर आले. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (जीएसडीए) आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) आणि सीईओंपी यांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये तेवीस गावांना दरडीचा तीव— धोका आहे. या गावांना संरक्षणात्मक कामे सुचविली होती. त्यानुसार आतापर्यंत पाच गावांतील कामे पूर्ण झाली आहेत. त्यासाठी तीन कोटी 65 हजार रुपये प्राप्त झाले आहेत. तसेच कोंढरी, घुटके, धानवली या तीन गावांचे तत्काळ पुनवर्सन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार विभागीय आयुक्तांमार्फत राज्यशासनाला पुनर्वसनाचा प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, मागील तीन वर्षांपासून हा प्रस्ताव धूळ खात पडून आहे.
घाटांवर नजर; कात्रज बोगद्यात वेगमर्यादा 
मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वारंवार होणार्‍या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान वाहतूक करणार्‍या सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहनांकरिता 40 कि. मी. प्रतितास वेगमर्यादा निश्चित केल्याचे अंतिम आदेश पुणे शहर वाहतूक शाखेकडून जारी करण्यात आले आहेत. राज्य शासन गृह विभागाच्या 27 सप्टेंबर 1996 च्या अधिसूचनेनुसार अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांच्या सूचना व हरकतींवर विचार करून हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
भोर तालुक्यातील  पाच गावे धोक्याच्या छायेत
भोर तालुक्यातील डेहेण,  सोनारवाडी, धानवली, जांभुळवाडी आणि कोंढरी ही गावे डोंगराखाली असल्याने पावसाळ्यात येथील घरांना धोका निर्माण होऊन जीवितहानी होण्याची भीती आहे. यामधील काही गावांचे पुनर्वसन प्रस्ताव  मंजुरीअभावी रखडले आहेत. तालुक्यातील वेळवंड खोर्‍यातील डेहेण आणि सोनारवाडी, निरा देवघर धरणभागातील धानवली, आंबवडे खोर्‍यातील जांभुळवाडी आणि हिरडस मावळ खोर्‍यातील कोंढरी  गावांचा यामध्ये समावेश आहे. ही पाच गावे डोंगराखाली असल्याने पावसाळ्यात येथील घरांना धोका निर्माण होऊन जीवितहानी होण्याची भीती आहे. शासनाने अतिवृष्टीच्या छायेत असणार्‍या गावांना  ठरावीक निधी मंजूर केला होता.
SCROLL FOR NEXT