Latest

Video : गोव्यातील कुशावती नदीचा रुद्रावतार, पुरामध्ये बुडाला पारोडा गाव

अविनाश सुतार

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : मुसळधार पावसामुळे केपेच्या कुशावती नदीला पूर येऊन एका आठवड्यात सलग दुसऱ्यांदा पारोडा गाव पाण्यात बुडाला आहे. केपे आणि मडगावला जोडणारा गुडी ते पारोडा हा सुमारे चार किलोमीटरचा रस्ता आणि पारोडा येथील पूल पाण्याखाली गेला आहे. पाण्याची पातळी वाढत चालल्यामुळे सभोवतालच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पारोडातील काही कुटुंबानी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरू केले आहे.

याच आठवड्यात मंगळवारी पारोडा आणि गुडी ला जाणारा रस्ता पाण्यात बुडाला होता. पण पारोडा येथिल घरांपर्यंत पाणी आले नव्हते. गुरुवारी रात्री पासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी पहाटे पारोडा गाव पाण्याखाली गेला आहे.

सविस्तर माहितीनुसार सुमारे आठ घरात पुराचे पाणी शिरले असून पाण्याची पातळी वाढत चालल्याने लोकांनी दुसऱ्या जागी स्थलांतर करण्यास सुरु केले आहे. माजी सरपंच दीपक खरंगटे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुराचे पाणी नदीला जाऊन मिळाल्यास मोठा हाहाकार माजणार आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे कुशावती नदीने रुद्रावतार धारण केला आहे. अजून साळावली धरणातून पाणी सोडण्यात आलेले नाही. साळावळी धरण भरून वाहू लागल्यास कुशावती नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढणार आहे.

पर्वतावर जाणाऱ्या रस्त्यापर्यंत पाणी पोचले असून पर्वतावर जाणारा रस्ता बंद झाला आहे. पर्वत परिसरात राहणाऱ्या लोकांना मुख्य रस्त्याचा वापर करता येत नसल्याने मडगावला जाण्यासाठी त्यांना गुडीला जाऊन मिळणाऱ्या आड वाटेचा आधार घ्यावा लागला आहे. पारोडा ते गुडी रस्त्याच्या दुतर्फा असलेले सखल भाग पाण्याने भरून गेले आहेत. सुमारे चार किलोमीटरचा मार्ग पाण्यात बुडल्यामुळे केपे पोलिसांनी ताबडतोप बॅरिकेट्स लावून वाहतुकीसाठी हा रस्ता बंद केला. मडगावला जाणारी वाहतुक तीळामळ चांदोर मार्गे मार्गे वळवली आहे. अचानक रस्ता बंद झाल्याने सर्वांत जास्त त्रास नोकरदार आणि विद्यार्थ्यांना सोसावा लागला. नेत्रावळी सांगे, वाडे ,वालकीणी, रिवण केवण, सुलकर्णा, तिळामळ, कुडचडे, सावर्डे, कुळे, मोले, शिगाव आदी भागांतील नोकरदारांना प्रवाशी बसेसचा आधार आहे. नेहमी प्रमाणे बसधरून हे लोक मडगाव आणि पणजी येथे कामाला जायला निघाले होते. पण पारोडाचा रास्ता पाण्यात बुडाल्याने त्यांना मडगाव पर्यंत प्रवास करता आला नाही. काही बस मालकांनी पारोडा बुडाल्याचे समजताच कुडचडे वरून थेट आपल्या बसेस चांदोर मार्गे वळवल्या होत्या. त्यामुळे बाणसाय, काकुमड्डी, तिळामल, टाकी तसेच केपेतील लोकांना कामाला दांडी मारावी लागली आहे.

हे वाचलंत का?

SCROLL FOR NEXT