Latest

Vidarbha Lok Sabha Election : पूर्व विदर्भात प्रतिष्ठेच्या, चुरशीच्या लढती

अनुराधा कोरवी

पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदार संघात 19 एप्रिल रोजी मतदान होत आहे. यात नागपूर, रामटेक, भंडारा- गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर अशा महत्त्वाच्या लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. गेल्यावेळी या पाचही जागा महायुतीच्या ताब्यात असल्या तरी यावेळी काँग्रेसने नवे उमेदवार देत तगडे आव्हान उभे केल्याचे म्हणता येईल. नागपूर, गडचिरोली, भंडारा या तीन मतदार संघात महायुतीने विद्यमान खासदार नितीन गडकरी, अशोक नेते आणि सुनील मेंढे यांना मैदानात उतरवले असून, चंद्रपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार, तर रामटेक लोकसभा मतदार संघात काँग्रेसमधून शिवसेनेचा भगवा हाती घेत रिंगणात उतरलेले राजू पारवे यांची कसोटी लागणार आहे. विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट या मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कापावे लागले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अनुराग ठाकूर, गोविंदा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अशा अनेक नेत्यांच्या सभांनी प्रचाराची रणधुमाळी रंगली आहे.

गडकरींचे मताधिक्य किती?

नागपूर मतदार संघात भाजपचे हेवीवेट नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची थेट लढत काँग्रेसचे शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांच्याशी आहे. परस्परांचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेसचे सर्व नेते एकजुटीने कामाला लागल्याने विकास ठाकरे यांची उमेदवारी आव्हानाची ठरू शकेल. या मतदार संघात दलित मुस्लिम मतांची लक्षणीय संख्या आहे. 2014 साली काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांना नितीन गडकरी यांनी पावणेतीन लाख मतांनी पराभूत केले. त्यावेळी 'आप'च्या अंजली दमानिया यांनी 74 हजार, तर बसपाचे मोहन गायकवाड यांनी 96 हजार मते घेतली. सपानेही आपली ताकद दाखविल्याने त्याचा फटका काँग्रेसला बसला.

यानंतरच्या 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने नाना पटोले यांना मैदानात उतरवले. नितीन गडकरी यांच्या विरोधात त्यांनी 4 लाख 44 हजार मते घेतली. 13 वेळा या मतदार संघातून काँग्रेसने विजय मिळवला असून, तीन वेळा भाजपला हा मतदारसंघ काबीज करता आला आहे. 2024 च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. बसपाची या मतदार संघात शक्ती असली, तरी थेट लढतीत दलित व मुस्लिम मतदारांची मते यावेळी बर्‍यापैकी काँग्रेसला मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याचवेळी हलबा मतदार जे गेल्यावेळी नितीन गडकरींच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते, यावेळी यात विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुसरीकडे गडकरी यांच्यासाठी तेली समाजाने पुढाकार घेतला असताना ठाकरे यांच्यासाठी कुणबी मतांची एक गठ्ठा साथ त्यांना मिळाल्यास ही लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. हायटेक प्रचाराच्या दृष्टीने गडकरी यांनी आघाडी घेतली असताना व नागपूरचा नव्हे तर विदर्भ आणि देशाचा चेहरा मोहरा बदलण्यात, पायाभूत सुविधा उभारण्यात गडकरी यांचे मोलाचे योगदान, ही सर्वसामान्य मतदारांसाठी त्यांच्या दृष्टीने पसंतीची पावती आहे. या पार्श्वभूमीवर गडकरी किती मताधिक्याने विजयी होणार, हा औत्सुक्याचा प्रश्न आहे.

रामटेक शिवसेना (शिंदे) राखणार?

उमेदवार काँग्रेसचा, चिन्ह शिवसेनेचे आणि निवडून आणण्याची जबाबदारी भाजपची हे समीकरण नागपूर जिल्ह्यात रामटेक मतदार संघात खरे झाल्यास शिवसेना रामटेकचा गड पुन्हा एकदा कायम राखणार आहे. उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांच्या हाती शिवसेनेचा भगवा झेंडा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना उमेदवार केले. यंत्रणा कामाला लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. नवा चेहरा ही पारवे यांची जमेची बाजू, तर दोनदा विजयी झालेल्या खा. कृपाल तुमाने यांना तिकीट नाकारल्याने आणि भाजपने आपला निष्ठावान उमेदवार का दिला नाही, अशी नाराजी असताना शिवसेना रामटेकचा गड राखणार का, हा खरा प्रश्न आहे.

जि. प. माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांची उमेदवारी जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्याने बाद झाली. त्यांचे पती श्यामकुमार ऊर्फ बबलू बर्वे उमेदवार झाले. काँग्रेसचे मोठे नेते प्रचाराला आलेले नसताना माजी मंत्री व आमदारकी रद्द झालेले काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी आणि सहानुभूती मिळालेल्या रश्मी बर्वे यांनी ही निवडणूक मनावर घेतली आहे. काँग्रेसपुढे बसपासोबतच वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांचे मतविभाजनाचे आव्हान आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दोन सभा घेत काँग्रेसला लक्ष्य केले.

असंतुष्टांना कामाला लावण्याचे आव्हान शिंदे गट आणि भाजपपुढे शेवटच्या टप्प्यात आहे. महायुतीकडे तीन आणि मविआकडे तीन असे विधानसभा मतदारसंघ असताना केदार विरुद्ध भाजप लढाईत उमरेड व सावनेर विधानसभा मतदारसंघ निर्णायक ठरणार आहेत.

भंडारा-गोंदिया पटेल-पटोलेंची होमपीचवर कसोटी

काँग्रेसचा गड असलेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता भाजपचे एकहाती वर्चस्व आहे. पुन्हा ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. विद्यमान खासदार सुनील मेंढे यांची जागा पूर्ववत ठेवताना महायुती आणि खा. प्रफुल्ल पटेल यांची तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गृह मतदारसंघ असल्याने आणि त्यांनी स्वतः ऐनवेळी माघार घेत आपल्या मर्जीचा उमेदवार प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देत निवडून आणण्याची जबाबदारी घेतल्याने, त्यांचीही कसोटी लागणार आहे.

काही प्रमाणात सुरुवातीपासून भाजपमध्येही उमेदवार बदलाच्या मागणीमुळे नाराजी आहे. डॉ. प्रशांत पडोळे हे दिवंगत सहकारमहर्षी यादवराव पडोळे यांचे सुपुत्र असून, वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे नाव आहे. बसपा, वंचित बहुजन आघाडीच्या मतविभाजनावर सारा खेळ आहे. नाना पटोले यांच्यामागे व्यक्तिगत मोठा जनाधार असल्याने काँग्रेसचा नवा चेहरा असलेला उमेदवार निवडून आणण्यासाठी ते जोमाने कामाला लागले आहेत.

गडचिरोली-चिमूर भाजप-काँग्रेसमध्ये चुरस!

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते आणि महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान अशी चुरशीची लढत होत आहे. बसपा, वंचित बहुजन आघाडी किती मते घेणार, यावर यावेळी मताधिक्य ठरणार आहे. गेल्यावेळी इतरत्र मोठे मताधिक्य भाजपला मिळताना या मतदार संघात ते हजारांवर आले. डॉ. नामदेव उसेंडी जे काँग्रेस उमेदवार होते, ते आता महायुतीसोबत आहेत.

काँग्रेसने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे निष्ठावान नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली आहे. सुशिक्षित, नवा चेहरा म्हणून खूप आधीपासूनच ते कामाला लागले, ही त्यांची जमेची बाजू आहे. विद्यमान खासदार अशोक नेते तिसर्‍यांदा लढत असल्याने त्यांची भाजप व काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये 'वन टू वन' फाईट आहे.

चंद्रपूर : मुनगंटीवार- धानोरकर यांच्यात चुरस

राज्याच्या राजकारणातील भाजपचे हेवीवेट नेते, पालकमंत्री पदापासून तर अर्थमंत्री पदापर्यंत अनेक पदे भूषविलेले सुधीर मुनगंटीवार 33 वर्षांनंतर चंद्रपूर लोकसभा मतदार संघात निवडणुकीच्या मैदानात आहेत. मुनंगटीवार यांचा थेट मुकाबला गेल्यावेळी राज्यात काँग्रेसला एकमेव विजय देणारे दिवंगत खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्याशी आहे. राज्याच्या राजकारणातील ही काट्याची टक्कर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातील पहिली सभा चंद्रपूरला झाली. ही जमेची बाजू असताना आक्षेपार्ह वक्तव्याने अधिक अडचणीत आल्याची चर्चा आहे.

कुणबी, ओबीसी प्राबल्य असलेल्या या मतदार संघात वंचित उमेदवार तिसर्‍या क्रमांकावर राहिले. त्यांना 1 लाख 16 हजार मते मिळाली.

पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांना आता काँग्रेसने अखेरच्या क्षणी विचारपूर्वक उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी यांच्यासाठी दावेदारीने हा मतदारसंघ चर्चेत आला. त्यामुळे काँग्रेसमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. ओबीसी आणि कुणबी मते निर्णायक ठरणार असल्याने भाजपने शेवटच्या टप्प्यात छगन भुजबळ यांचा दौरा आयोजित केला. आता मोदी यांच्या देश विकासाच्या आवाहनाला, की सहानुभूतीच्या भावनिक आवाहनाला मतदार साथ देतात, हे महत्त्वाचे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT