Latest

बांगला देश मुक्‍ती युद्ध सुवर्ण दिन : बांगला देश विजयाची शौर्यगाथा

Arun Patil

1971 मध्ये पूर्व पाकिस्तान पश्‍चिम पाकिस्तानापासून वेगळा झाला आणि बांगला देश याची निर्मिती झाली. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली या युद्धात भारतीय लष्कराने निर्णायक भूमिका पार पाडली. या युद्धातील निर्णायक क्षणांविषयी…

थरारक कालपट

1947 मध्ये भारताची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानची निर्मिती झाली. यामध्येही पूर्व पाकिस्तान आणि पश्‍चिम पाकिस्तान असे दोन भाग पडले. पश्‍चिम पाकिस्तानकडून पूर्व पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात अन्याय करण्यात येऊ लागला. पाकिस्तानचा तत्कालीन लष्करप्रमुख जनरल अयुबच्या विरोधात पूर्व पाकिस्तानमध्ये असंतोष निर्माण होत गेला. पूर्व पाकिस्तानमध्ये आंदोलन सुरू झाले आणि आंदोलनाचे नेतृत्व करणारे मुजीब-उर-रेहमान यांनी एप्रिल 1971मध्ये पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्याची हाक दिली. यासाठी मुक्‍ती वाहिनीने आपला लढा सुरू केला.

पश्‍चिम पाकिस्तानने 26 मार्च 1971 रोजी पूर्व पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सर्च लाईट सुरू केले. या दरम्यान होत असलेली मारहाण, शोषण, महिलांवरील बलात्कार, हत्या यांसारख्या अत्याचारांविरोधात मुक्‍ती वाहिनीने स्वातंत्र्याचा लढा सुरू केल्यानंतर पूर्व पाकिस्तानमधील जनतेवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे तेथील लोक भारतात शरण घेऊ लागले. त्यानंतर भारत सरकारवर हस्तक्षेपासाठी दबाव वाढू लागला.

मुक्‍ती वाहिनीत पूर्व पाकिस्तानमधील सैनिक आणि हजारो नागरिकांचा समावेश होता. 31 मार्च 1971ला भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संसदेत भाषण करताना पूर्व पाकिस्तानमधील लोकांना मदत केली पाहिजे, असे सांगितले. 29 जुलै 1971ला भारतीय संसदेने सार्वजनिकरीत्या पूर्व पाकिस्तानमधील युवकांना मदत करण्याची घोषणा केली.

भारतीय लष्कराने तत्पूर्वीच 15 मे 1971 ला ऑपरेशन जॅकपॉट लाँच करून, त्याअंतर्गत मुक्‍ती वाहिनीच्या युवकांना प्रशिक्षणाबरोबरच शस्त्रास्त्रे, पैसा आणि युद्ध साहित्य पुरविण्यास सुरुवात केली.

ऑक्टोबर-नोव्हेंबर 1971मध्ये इंदिरा गांधी यांनी युरोप आणि अमेरिकेचा दौरा करून तेथील नेत्यांसमोर भारताचा दृष्टिकोन मांडला. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी मदत करण्यास नकार दिला. मात्र, पाकिस्तानने भारताच्या सीमेवर कोणतीही आगळिक केली तर भारत मागे हटणार नाही, असे इंदिरा गांधी यांनी एकप्रकारे जगाला ठणकावून सांगितले.

21 नोव्हेंबर 1971ला भारतीय लष्कराने मुक्‍ती वाहिनीबरोबर तत्कालीन पूर्व पाकिस्तानमध्ये घुसून रणनीतीच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण अशा गरीबपूर गावाला मुक्‍त केले. 23 नोव्हेंबर 1971ला पाकिस्तानचे राष्ट्रपती याह्या खान यांनी आपल्या सैन्याला युद्धासाठी तयार राहण्यास सांगितले.

3 डिसेंबर 1971ला भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी कोलकाता येथे जाहीर सभेत जनतेला संबोधित करत असताना पाकिस्तानी हवाई दलाने पठाणकोट, श्रीनगर, अमृतसर, जोधपूर, आग्रा आदी लष्करी हवाई तळांवर बॉम्बफेक सुरू केली. त्यामुळे सरकारने प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला. यातून भारत-पाकिस्तान युद्धाची ठिणगी पडली. 4 डिसेंबरच्या सकाळी भारताने अधिकृतरीत्या पाकिस्तानविरुद्ध युद्धाची घोषणा केली.

भारतीय जवानांनी पूर्व पाकिस्तानमधील जेसोर व खुलना ताब्यात घेतले. 14 डिसेंबर 1971ला भारतीय लष्कराने ढाक्याच्या गव्हर्न्मेंट हाऊसमध्ये पाकिस्तानच्या उच्च अधिकार्‍यांची बैठक होणार असल्याचा एक गोपनीय संदेश पकडला. या बैठकीदरम्यानच भारतीय मिग-21 विमानांनी बाँब टाकून इमारतीचे छत उडविले. त्यानंतर दोनच दिवसांत 16 डिसेंबर 1971ला पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करली आणि बांगला देश ची निर्मिती झाली.

इंदिरा गांधी आणि माणेकशॉ

एप्रिल 1971मध्ये पूर्व पाकिस्तानमधील परिस्थिती पाहून इंदिरा गांधी यांनी लष्करी कारवाईचा विचार लष्करप्रमुख फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांना बोलून दाखविला; पण चीनकडून हल्ल्याची शक्यता, खराब हवामानाचे कारण देत त्यांनी इंदिरा गांधींना थोडा वेळ देण्यास सांगितले. इंदिरा गांधींनी त्यांच्यावर विश्‍वास दाखविला.

त्यानंतर डिसेंबरमध्ये भारताने ज्यावेळी युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतला, त्यावेळी माणेकशॉ यांच्या लढाऊ नेतृत्वाखाली भारताने केवळ 13 दिवसांत पाकिस्तानला शरणागती पत्करायला भाग पाडले. 16 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता जनरल माणेकशॉ यांनी इंदिरा गांधींना फोन करून ढाका आता मुक्‍त झाले असून, पाकिस्तानने शरणागती पत्करल्याची माहिती दिली. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी संसदेत जाऊन ढाका आता स्वतंत्र देशाची राजधानी असल्याची घोषणा केली.

पाकिस्तानची शरणागती

जनरल माणेकशॉ यांनी जनरल जेएफआर जेकब यांना 16 डिसेंबर रोजी शरणागतीच्या तयारीसाठी तातडीने ढाक्यात हजर होण्याचा संदेश पाठविला. पाकिस्तानी ले. जनरल एएके नियाजीकडे ढाक्यात 26 हजारपेक्षा अधिक सैनिक होते, तर भारताकडे तेथून 30 किलोमीटर अंतरावर केवळ 3 हजार जवान होते.

जनरल नियाजीच्या खोलीत एका टेबलावर शरणागतीची कागदपत्रे ठेवण्यात आली होती. लेफ्टनंट जनरल जगजितसिंह अरोरा ढाक्यात पोहोचले. नियाजीने रिव्हॉल्व्हर व बिल्ले जनरल अरोरा यांच्या हवाली केले. दोघांनी दस्तावेजावर सह्या केल्या. 17 डिसेंबर 1971 रोजी 93 हजार पाकिस्तानी सैनिकांना युद्धबंदी बनविण्यात आले. सुमारे 3900 भारतीय जवानांनी हौतात्म्य पत्करले.

भारतीय पॅराट्रूपर्सचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला

1971च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान पूर्व पाकिस्तानमधील (आताच्या बांगला देश मधील) तंगैलमध्ये भारतीय लष्कराने 11 डिसेंबर रोजी खास एअरड्रॉप मिशन राबविले. लेफ्टनंट कर्नल कुलवंत सिंह पन्नू यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराच्या सेकंड पॅराशूट बटालियनने आपली मोहीम फत्ते केली होती.

पाकिस्तानी सैन्याच्या एका ब्रिगेडला ढाक्याहून परतण्याची संधी न देण्याची कामगिरी या बटालियनवर सोपविण्यात आली होती. तंगैलजवळचा पूल ताब्यात घेऊन पाकिस्तानी सैन्याला रोखण्याची योजना बनविण्यात आली. स्फोटकांनी पूल उडविला जाऊ शकत होता; पण भारतीय लष्करालाही ढाक्यात लवकर पोहोचायचे होते. त्यामुळे पाकिस्तानी सैन्य पूल ओलांडत असताना त्यांच्यावर हल्ल्याची (एअरड्रॉप) योजना बनविण्यात आली.

तब्बल 700 पॅराट्रूपर्सनी सायंकाळी 4.30 वाजता भारतीय हवाई दलाच्या 52 विमानांतून उड्या मारल्या आणि हवेतच राहून पाकिस्तानी सैन्याची प्रतीक्षा करू लागले. दुसर्‍या महायुद्धानंतरचे हे सर्वात मोठे एअरड्रॉप ऑपरेशन होते. आकाशात फक्‍त पॅराशूटच दिसत होते. पाकिस्तानी सैन्य आल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. पाकचे अनेक सैनिक शेतात पळून गेले, काही मारले गेले, तर काहींना बंदी बनविण्यात आले.

अविस्मरणीय अनुभव!

डिसेंबर 1970 मध्ये बांगला देश युद्ध सुरू झाले, त्यावेळी मी सेकंड लेफ्टनंटच्या पोस्टवर कार्यरत होतो. त्यावेळी रॉचे प्रमुख असलेल्या रामेश्‍वरनाथ काव यांना एकंदर कल्पना होती की, शेख मुजिबूर रहमानला पाकिस्तानचा पंतप्रधान बनू देणार नाहीत. त्यामुळे त्यांनी एक कमांडो फोर्स उभी करण्यास सुरुवात केली.

त्यांनीच तयार केलेली स्पेशल फ्रंटियर फोर्स पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये कमांडोमध्ये काम करणार्‍या अधिकार्‍यांना थेट समाविष्ट करून घेतले. तिथे त्यांच्यासोबत आम्ही प्रशिक्षण घेतले. 25 मार्च 1971 रोजी जेव्हा मुजिबूर रहमान यांनी स्वातंत्र्याची घोषणा केली, त्यादिवशी सायंकाळी त्यांना जनरल टिक्‍का खानने अटक केली आणि त्यांनी नरसंहारास सुरुवात केली.

जवळपास 30 लाख लोक तिथे मारण्यात आले आणि 1 कोटीहून अधिक जण पळून भारतात आले. त्यामध्ये ईस्ट बंगाल रायफल्सचे आणि ईस्ट बंगाल पोलिसचे अनेक अधिकारी होते. त्याचबरोबर नौदलाचेही काही अधिकारी होते. त्यांना शोधून काढून रामनाथ राव यांनी त्यांना मुक्‍ती वाहिनी उभी करण्यास मदत केली. आम्ही त्याचा एक भाग होतो.

एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यामध्ये आम्ही बांगला देश मध्ये गेलो. तिथे सिव्हिल ड्रेसमध्ये आम्ही लोकांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आणि घातपाताच्या कारवाया सुरू केल्या. आम्ही केलेल्या कारवायांमध्ये चितागाँगच्या हिल टॅ्रकच्या जंगलांमधील मुख्यालयावर आम्ही रेड टाकली. त्यामध्ये आम्हाला त्यांच्या चीफ ऑफ स्टाफ राव फर्मान अली याला मारायचे होते; पण तो पळून गेला. त्यावेळी आम्ही मिझो आर्मीचा चीफ असणार्‍या लाल डेंगाला पकडण्यामध्ये यश मिळवले.

भारतीय नौदलाने चितागाँग बंदरावर तोफा आणि विमानांचा हल्ला केला, त्यावेळी तेथून पळून येणारे लोक मिझोराममध्ये येऊ नयेत यासाठी आम्ही तेथे सापळा लावला होता. मी कमांडर होतो. त्यानंतर हिलीमध्ये झालेल्या लढाईमध्येही मी सहभागी होतो. बोगाईच्या रेडमध्येही मी सहभागी होतो. त्यानंतर आम्हाला पश्‍चिमेकडील भागात नेण्यात आले. 14-15 डिसेंबर रोजी तेथे हल्ला करायचा होता. त्यावेळी तिथे पूंछ क्षेत्रामध्ये नागपूरचे ब्रिगेडियर ए. व्ही. नातू कार्यरत होते.

पाकिस्तानच्या आर्टिलरींवर आपल्या 9 पॅरा कमांडोंनी हल्ला केला होता. त्यातही मी सहभागी होतो. या युद्धात ईस्टर्न आणि वेस्टर्न अशा दोन्ही ठिकाणी कमांडोंनी कारवाया केल्या. त्यात माझा सहभाग होता. जाँबाज, शौर्यवान सैनिकांमुळेच 1971 चे युद्ध भारताला जिंकता आले.
– कर्नल अभय पटवर्धन

गाझी पाणबुडी नष्ट

1971 च्या युद्धाचे चित्र बदलण्यात भारताची आयएनएस विक्रांत ही युद्धनौका महत्त्वपूर्ण फॅक्टर असल्याची पाकिस्तानला पुरेपूर जाण होती. त्यामुळे आयएनएस विक्रांतला बुडविण्यासाठी पाकिस्तानने आपल्या गाझी या पाणबुडीला पाठविले. 3 आणि 4 डिसेंबरच्या रात्री या पाणबुडीला जलसमाधी देण्यात भारतीय जवानांना यश आले. पीएनएस-गाझी हे 71च्या युद्धातील पाकिस्तानचे अतिशय गोपनीय आणि घातक शस्त्र होते. त्यावेळी भारताकडे एकही पाणबुडी नव्हती.

अशा परिस्थितीत गाझीला रोखणे आव्हानात्मक होते. 14 ते 22 नोव्हेंबरच्या दरम्यान पाकिस्तानने गाझीला मोहिमेवर पाठविले होते. भारतीय नौदलाने आयएनएस विक्रांतला सुरक्षित ठिकाणी पोहोचविण्याबरोबरच पाणबुडीविरोधी शस्त्रास्त्रांनी सज्ज आयएनएस राजपूत हीच आयएनएस विक्रांत युद्धनौका असल्याचे भासविण्यात आले.

आयएनएस विक्रांतला अंदमान-निकोबारजवळच्या एका गोपनीय ठिकाणी नेण्यात आले. गाझी पाणबुडी आयएनएस राजपूतलाच आयएनएस विक्रांत समजून पाठलाग करत होती. विशाखापट्टणम 2च्या किनार्‍यावर पाणबुडी टप्प्यात आल्यानंतर कॅप्टन लेफ्टनंट कमांडर इंदर सिंह यांनी आपल्या जवानांना पाणबुडी नष्ट करणारे दोन डेप्थ चार्जर टाकण्यास सांगितले. पाण्यात जाऊन डेप्थ चार्जरनी आपले काम पूर्ण केले. पाण्यात झालेल्या स्फोटाने गाझी सागरतळाला गेली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT