Latest

वीरपत्नीला घराची प्रतीक्षा ! लोटला चार वर्षांपेक्षा अधिककाळ

अमृता चौगुले

पिंपरी : चार वर्षापेक्षा अधिकचा काळ उलटूनही पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे शहीद जवान विशाल जाधव यांच्या कुटुंबीयांना महापालिका व शासनाकडून घर मिळालेले नाही. लालफितीच्या कारभारामुळे तसेच, अधिकार्‍यांच्या उदासीनतेमुळे वीरपत्नीला घर मिळत नसल्याने महापालिका वर्तुळात नाराजी व्यक्त केली जात आहे. ड्रेनेज लाइनसाठी दापोडी परिसरात खोदकाम सुरू होते. त्या खोल खड्ड्यात अडकलेल्या मजुरांना वाचविण्याचे काम फायरमन विशाल जाधव हे करत होते. मातीचा ढीग ढासळल्याने त्यात अडकून विशाल जाधव यांना वीरमरण आले. ही घटना 1 डिसेंबर 2019 ला घडली होती.

जीव पणाला लावून बचाव कार्यामध्ये असामान्य धाडस त्यांनी दाखविले. त्यामध्ये त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. कल्याण-डोंबिवली महापालिका आणि मुंबई महापालिकेच्या कर्मचार्यांना देण्यात आलेला शहीद दर्जा व सवलतीच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील फायरमन विशाल जाधव यांना शहीद दर्जा व अशा शहिदांना असणार्‍या सवलती आणि फायदे देण्याबाबत महापालिकेच्या
सर्वसाधारण सभेमध्ये ठराव मंजूर करण्यात आला.

शासन निर्णयानुसार शहीद झालेल्या अधिकारी व कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना निवासी जिल्ह्यात त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी एक सदनिका विनामूल्य दिली जाते. किंवा ज्या ठिकाणी म्हाडाची योजना असेल, तेथे त्या योजनेअंतर्गत एक सदनिका देण्यात येते. सदनिका
उपलब्ध नसेल तर निश्चित केलेल्या क्षेत्रफळानुसार 3 हजार रुपये प्रतिचौरस फूट या दराने रोख रक्कम दिली जाते. मात्र, चार वर्षे उलटल्यानंतरदेखील अद्याप शहीद जावध यांच्या वारसांना घर देण्यात आले नाही.

पिंपरीगाव येथील म्हाडाच्या इमारतीमध्ये 607 चौरस फुटाच्या सदनिकेची 56 लाख 88 हजार 933 रुपये किमत आहे. तसेच, 55 हजार 625 रुपये टीडीएस आहे. ही रक्कम भरण्याबाबत म्हाडाने महापालिकेस 5 ऑक्टोबर 2023 ला कळविले आहे. त्यावर रक्कम कोणाच्या नावाने पाठवायची असे पत्र महापालिकेने म्हाडास 16 ऑक्टोबर 2023 ला पाठविले. दरम्यान, अग्निशमन विभागाचे अधिकारी बदलल्याने पुढील प्रकिया ठप्प झाली. पुन्हा पहिल्यापासून प्रक्रिया सुरू केल्याने नाहक वेळ जात आहे. त्यामुळे घर मिळण्याची प्रक्रिया आणखी लांबली आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे आणि अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे शहीद विशाल जाधव यांना घर मिळण्यास विलंब होत आहे. या प्रकारामुळे महापालिका वर्तुळात नाराजी व्यक्त केली जात आहे.

आठवडाभरात घर देऊ
घर देण्याबाबत म्हाडा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे. महापालिका प्रशासन वीरपत्नीस घराचा लाभ देण्यास कटिबद्ध आहे. आठवड्याभरात ही प्रक्रिया पूर्ण करून त्यांना घर देण्यात येईल, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.

प्रशासकीय सर्व प्रकिया पूर्ण
सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आयुक्तांची मान्यता घेऊन लवकरात लवकर म्हाडाकडे रक्कम वर्ग करण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.ें

महापालिका अधिकार्‍यांकडून नाहक वेळकाढूपणा :
राज्य शासनाने घर देण्याबाबतचे आदेश महापालिकेस दिले आहेत. पिंपरी गावातील म्हाडाची 607 चौरस फुटांची सदनिका निवडली. वरील 7 चौरस फुटांची रक्कम मी भरली. तरीही 600 चौरस फूटांच्या रकमेचा धनादेश देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यात नवीन अधिकारी आल्याने पुन्हा पहिल्यापासून या प्रकरणाचा अभ्यास सुरू असल्याचे कारणे पुढे केली जात आहेत. या प्रकरणातील नियमाचा अभ्यास सुरू असल्याचे नवे कारण आता सांगितले जात आहे. म्हाडाकडून वारंवार फोन करून पैसे कधी भरणार? अशी विचारणा केली जात आहे. यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. असे शहीद विशाल जाधव यांच्या वीरपत्नी प्रियांका यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT