Latest

महत्त्वाची बातमी ! वरंधा घाट 30 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहतुकीकरिता बंद

अमृता चौगुले

भोर : पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर-भोर-महाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 (डीडी) वरील भोर तालुक्याच्या हद्दीतील वरंधा घाटरस्ता पावसाळा कालावधीत 22 जुलै ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत अवजड वाहतुकीकरिता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी दिला असल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली. वरंधा घाटातील पुणे जिल्ह्याच्या हद्दीतील रस्ता हा नागमोडी वळणाचा आहे. घाटात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते.

अनेकवेळा घाटात अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे, अशा घटना घडतात. त्यामुळे संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्याच्या उद्देशाने हा घाटरस्ता अवजड वाहनांसाठी पावसाळा कालावधीत 22 जुलै ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बंद ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यात भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नारंगी आणि लाल इशार्‍यावेळी सर्व प्रकारच्या अवजड, मध्यम व हलक्या प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीकरिता रस्ता बंद राहील. नारंगी आणि लाल इशारा नसलेल्या कालावधीत वरंधा घाटरस्ता फक्त हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT