Latest

उत्तर मध्य मुंबईचा उमेदवार बदलला; वंचितचे दहा उमेदवार घोषित

अनुराधा कोरवी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी रात्री उशिरा आणखी दहा उमेदवार जाहीर केले. उमेदवारांच्या या चौथ्या यादीत उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबईसह भिवंडी व रायगड येथील लोकसभा मतदारसंघांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, वंचितने उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिलेले अबूल हसन खान यांना दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी दिली आहे.
वंचितच्या चौथ्या यादीत उत्तर मुंबईतून बीना रामकुबेर सिंग, उत्तर पश्चिम मुंबईत संजीव कुमार अप्पाराव कलकोरी व अबूल हसन खान यांना आता दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे.

त्याचबरोबर कुमुदिनी रवींद्र चव्हाण (रायगड), भाऊसाहेब रावसाहेब अंधळकर (उस्मानाबाद), हनुमंतकुमार मनराम सूर्यवंशी (नंदुरबार), प्रफुल्ल कुमार रायचंद लोढा (जळगाव), गुलाब मोहन बर्डे (दिंडोरी), विजया धीकर म्हात्रे (पालघर), निलेश सांबरे (भिवंडी) यांना उमदेवारी दिली आहे.

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. या मतदारसंघात भाजपाच्या पूनम महाजन या खासदार आहेत. मुस्लिम मतदारांच्या मतांमध्ये फूट टाळण्यासाठी वंचितने अबूल हसन खान यांना आता दक्षिण मध्य मुंबईतून उमेदवारी दिली आहे. दक्षिण मध्य मुंबईतून खान यांचा विजय शक्य असल्याने तेथे त्यांना उमेदवारी दिल्याचे पक्षाकडून सांगितले जात आहे. तर दुसरीकडे वंचितने नागपूर येथे काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे येथूनही वंचितकडून उमेदवार उभा न करता काँग्रेसला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

SCROLL FOR NEXT