Latest

Rajesh Tope : ‘राज्यात लसीची टंचाई; तीन दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक’

backup backup

जालना ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात लसीची खूपच टंचाई जाणवत आहे. दोन-तीन दिवस पुरतील इतकेच डोस शिल्लक आहेत. लसीअभावी लहान मुलांचे लसीकरण रेंगाळले असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. लसीचा पुरेसा साठा पुरविण्याची मागणी पंतप्रधानांच्या बैठकीत केली असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज्याला कोव्हॅक्सिनचे साडेसहा लाख डोस मिळाले आहेत. ते मुंबईत आलेले आहेत. या लसीचे राज्यात वाटप केले जाणार आहे. अजूनही लसीची आवश्यकता आहे. आता 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच हा साठा आहे. मुंबईत लहान मुलांच्या लसीकरणाची गती मंदावलेली आहे.

10 दिवसांत फक्त 12 टक्के लसीकरण झालेले आहे. राज्यभरात मात्र लहान मुलांचे 40 टक्के लसीकरण झाले आहे. अशीच गती राहिल्यास 15 दिवसांत त्यांचे लसीकरण पूर्ण होईल, अशी माहिती टेपे यांनी दिली.

Rajesh Tope :  लसीकरण ऐच्छिक करावे काय; राज्याची केंद्राकडे विचारणा

पहिल्या डोसपासून राज्यात 98 लाख नागरिक वंचित आहेत. लसीकरण ऐच्छिक केल्याने अनेकजण लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे लसीकरण कायद्याने बंधनकारक करता येईल का, याबाबत केंद्राकडे विचारणा केल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी सांगितले.

दररोज कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. असे असले तरी फार चिंता करण्याचे कारण नाही. फक्त नागरिकांनी नियम पाळावे, असे आवाहन त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले. होम टेस्ट किटच्या माध्यमातून घरच्या घरी कोरोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे कळते.

मात्र, पॉझिटिव्ह आल्यानंतर देखील अनेकजण पॉझिटिव्ह असल्याचे सांगत नाहीत. त्यामुळे कोण पॉझिटिव्ह आले आहे हे आरोग्य विभागाच्या रेकॉर्डवर येणे गरजेचे आहे. अशा किट विकणार्‍यांकडून विकत घेणार्‍यांचे रेकॉर्ड मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

इंदोरीकरांचे वक्तव्य सकारात्मक घ्यावे

मी माळकरी आहे आणि तिसरी लाट ही माळा काढणार्‍यांसाठी आहे, असे वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी केले होते. यावर त्यांचे वक्तव्य हे सकारात्मक द़ृष्टीने घ्यावे, असेही टोपे म्हणाले. इंदोरीकर महाराज हे शाकाहारी असल्याने ते वक्तव्य शाकाहार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी असावे, असे ते म्हणाले.

SCROLL FOR NEXT