पुढारी ऑनलाईन डेस्क : Uttarkashi Tunnel Rescue Operation : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या कामगारांना कधीही बाहेर काढण्यात येईल. बोगद्यातील खोदकाम पूर्ण होत आले आहे. 800 मिमी व्यासाचा पाइपही टाकण्यात आल्या आहेत. एनडीआरएफची टीम पाईपद्वारे कामगारांपर्यंत पोहोचली आहे. ही टीम कामगारांना पाईपद्वारे बाहेर काढण्यासाठी मदत करेल. लवकरच कामगारांना बाहेर काढता येईल. कामगारांना बाहेर काढल्यानंतर त्यांना थेट रुग्णालयात नेण्यात येईल.
एनडीएमएचे सदस्य लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांनी सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास पत्रकार परिषदेत बचावकार्याविषयी माहिती देताना सांगितले की, 'आम्ही ५८ मीटरवर आहोत. आता केवळ थोडे अंतर बाकी आहे. आत अडकलेल्या कामगारांनी सांगितले की त्यांना आवाज ऐकू येत आहेत.' (Uttarkashi Tunnel Rescue Operation)
हसनैन पुढे म्हणाले की, प्रत्येक कामगाराला बाहेर काढण्यासाठी ३-५ मिनिटे लागतील असा अंदाज आहे. सर्व ४१ जणांना बाहेर काढण्यासाठी ३-४ तास लागतील अशी शक्यता आहे. एनडीआरएफच्या तीन तुकड्या बोगद्यात जाऊन बाहेर काढण्याचे आयोजन केले. त्यांना एसडीआरएफ (SDRF) मदत करेल. पॅरामेडिक्सदेखील बाहेर काढण्याच्या वेळी बोगद्याच्या आत जातील,' असे त्यांनी सांगितले. (Uttarkashi Tunnel Rescue Operation)
'सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सर्व खबरदारी घेतली जात आहे. बचावकार्यातील लोकांच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. कोणतीही घाई केली जाणार नाही. बोगद्याच्या आतील सर्व ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुमारे ४-५ तास लागतील,' असेही हसनैन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरकाशीच्या सिल्क्यारा बोगद्यात अडकलेल्या सर्व ४१ कामगारांची प्रकृती चांगली आहे.