Latest

Uttarakhand tunnel collapse Updates : दहाव्या दिवशी बोगद्यात पोहोचला कॅमेरा, ४१ कामगारांचा व्हिडिओ आला समोर

निलेश पोतदार

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. अधिकाऱ्यांनी वॉकी टॉकीच्या माध्यमातून कामगारांशी संवाद साधला. या दरम्यान प्रत्येक मजुराला कॅमेरात आपला चेहरा दाखवण्यासही सांगण्यात आले. याआधी सोमवारी संध्याकाळी पहिल्यांदाच कामगारांना डाळ आणि खिचडी पाठवण्यात आली.

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बोगदा कोसळल्यामुळे अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठी १० दिवसांपासून बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यात व्यस्त असलेल्या यंत्रणांना सोमवारी मोठे यश मिळाले. पहिल्यांदाच कामगारांना डाळ आणि खिचडी पाठवण्यात आली. हे अन्न 6 इंच रुंद पाईपद्वारे बाटल्यांमध्ये भरून कामगारांना पाठवले जात होते. दरम्यान, बोगद्याच्या आतील व्हिडिओही पहिल्यांदाच समोर आला आहे. बोगद्यात कामगार कोणत्या परिस्थितीत राहत आहेत हे पाहता येईल. यावेळी बचावकार्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी वॉकीटॉकीद्वारे कामगारांशी संवादही साधला.

बोगद्यातील कामगार आणि लोकांची स्थिती जाणून घेण्यासाठी पाईपद्वारे बोगद्यात कॅमेरा पाठवण्यात आला आहे. यामध्ये बोगद्याच्या आतील परिस्थिती टिपण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी वॉकी टॉकीजच्या माध्यमातून कामगारांशी संवाद साधला. बोगद्याच्या आतून समोर आलेल्या फुटेजमध्ये त्यांना 10 दिवस बोगद्यात कसे राहावे लागले हे दिसून येते.

बोगद्यातून कामगारांना वाचवण्यात सहभागी असलेले कर्नल दीपक पाटील म्हणाले की, आम्ही बोगद्यात अडकलेल्या लोकांना अन्न, मोबाईल फोन आणि चार्जर पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही आत वायफाय कनेक्शन स्थापित करण्याचा प्रयत्न करू. डीआरडीओचे रोबोटही काम करत आहेत.

बाटल्यांद्वारे अन्न पाेहाेचवले गेले

सोमवारी रात्री बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना खिचडी आणि डाळ यांनी भरलेल्या २४ बाटल्या पाठवण्यात आल्या. 9 दिवसांनंतर पहिल्यांदाच कामगारांना पोटभर जेवण मिळाले. याशिवाय संत्रा, सफरचंद आणि लिंबाचा रसही पाठवण्यात आला. आज दलिया आणि इतर खाद्यपदार्थ कामगारांना पाठवले जातील. आत्तापर्यंत फक्त मल्टी व्हिटॅमिन्स, पफ केलेला तांदूळ आणि ड्रायफ्रूट्स पाईप्सद्वारे पाठवले जात होते. हे अन्न 6 इंच रुंद पाईपद्वारे कामगारांपर्यंत पोहोचवण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT