नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Uttarakhand Tunnel Rescue : उत्तरकाशी येथील निर्माणाधीन बोगद्याचा एक भाग 12 नोव्हेंबरला ब्रह्मखल-पोलगावच्या सिल्क्यरा येथे कोसळला. मंगळवारी (28 नोव्हेंबर) सर्व 41 कामगारांना बाहेर काढण्यात यश आले. अडकलेल्या 41 कामगारांना वाचण्यासाठी बचावकार्य युध्दपातळीवर सुरू होते. 41 कामगारांना वाचवण्यासाठी शासनाच्या वतीने विविध संस्थांना एकत्र करून त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञांनाही बोलवून प्रयत्न सुरू होते.
12 नोव्हेंबर- उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथील निर्माणाधीन बोगद्याचा एक भाग ब्रह्मखल-पोलगावच्या सिल्क्यरा येथे कोसळला. यात ४१ मजुर अडकले आहेत. बोगद्यातून पाणी काढून टाकण्यासाठी टाकलेल्या पाईपमधून ऑक्सिजन, औषध, अन्न आणि पाणी पाठवले जाऊ लागले. बचाव कार्यात एनडीआरएफ, आयटीबीपी आणि बीआरओ तैनात करण्यात आले होते.
13 नोव्हेंबर- उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घटनास्थळी भेट देऊन बोगद्याच्या जागेची पाहणी केली. संध्याकाळपर्यंत बोगद्याच्या आत २५ मीटर खोल पाइपलाइन टाकण्यास सुरुवात झाली. मात्र ढिगारा पुन्हा आत आल्याने २० मीटरनंतर काम थांबवावे लागले.
14 नोव्हेंबर : नॉर्वे आणि थायलंडच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ऑगर ड्रिलिंग मशीन आणि हायड्रॉलिक जॅक वापरण्यात आले. मात्र ही यंत्रेही निकामी झाली.
15 नोव्हेंबर: बचावकार्यात काही वेळ खोदकाम केल्यानंतर ऑगर मशीनचे काही भाग खराब झाले. दिल्लीहून हवाई दलाचे हरक्यूलिस विमान हेवी ऑगर मशीन घेऊन पोहोचले.
16 नोव्हेंबर: अमेरिकन ड्रिलिंग मशीन ऑगरची स्थापना पूर्ण झाल्यानंतर रात्री ८ वाजता पुन्हा बचावकार्य सुरू झाले. बोगद्याच्या आत १८ मीटर पाईप टाकण्यात आले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बचाव कार्याचा आढावा बैठक घेतली.
16 नोव्हेंबर : सकाळी दोन मजुरांची प्रकृती खालावली. त्यांना औषधे देण्यात आली. मोठ्या ऑगर मशीनच्या मार्गात दगड आल्याने खोदकाम थांबले. रात्री वरून बोगदा कापून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले.
18 नोव्हेंबर : खोदकामाचे काम दिवसभर ठप्प राहिले. अन्नाअभावी अडकलेल्या कामगारांनी अशक्तपणाची तक्रार केली. पाच ठिकाणांहून खोदकामाचे नियोजन करण्यात आले.
19 नोव्हेंबर: सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी उत्तरकाशीला पोहोचले, त्यांनी बचाव कार्याचा आढावा घेतला. सिल्क्यरा एंड येथून दुपारी ४ वाजता पुन्हा ड्रिलिंग सुरू करण्यात आले. बोगद्यात ज्याठिकाणी मलबा पडला होता तेथून छोटा रोबोट पाठवून अन्न पाठवण्याची किंवा बचाव बोगदा बांधण्याची योजना आखण्यात आली.
20 नोव्हेंबर: आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ञ अरनॉल्ड डिक्स यांनी उत्तरकाशी गाठून सर्वेक्षण केले आणि उभ्या ड्रिलिंगसाठी 2 जागा अंतिम केल्या. ऑगर मशीनसोबत काम करणाऱ्या कामगारांच्या बचावासाठी रेस्क्यू बोगदा तयार करण्यात आला होता.
21 नोव्हेंबर : एन्डोस्कोपीद्वारे कॅमेरा आत पाठवण्यात आला आणि अडकलेल्या मजुरांचे छायाचित्र प्रथमच समोर आले. त्याच्याशीही बोलणे झाले. सर्व कामगार सुखरूप आहेत. नवीन 6 इंची पाइपलाइनद्वारे कामगारांपर्यंत अन्न पोहोचवण्यात यश आले. ऑगर मशीनने ड्रिलिंग सुरू केले. केंद्र सरकारने तीन बचाव योजना जाहीर केल्या.
22 नोव्हेंबर- अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी 67 टक्के खोदकाम पूर्ण झाले. या बोगद्यात अडकलेल्या कर्मचार्यांशी व्हिडिओ माध्यमाद्वारे संपर्क स्थापित केला आहे. ऑगर मशीन वापरून कामगारांना वाचवण्यासाठी एनएचआयडीसीएलने सिल्क्यरा टोकापासून पुन्हा खोदकाम सुरू केले.
23 नोव्हेंबर: ऑगर मशीनद्वारे सुरु असलेले काम तीन वेळा थांबवले. संध्याकाळी उशिरा, ड्रिलिंग दरम्यान कंपनामुळे, मशीनचा प्लॅटफॉर्म आत गेला. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत खोदकाम थांबवण्यात आले.
24 नोव्हेंबर: सकाळी ड्रिलिंगचे काम सुरू असताना ऑगर मशीनच्या मार्गात स्टीलच्या पाईपमुळे काही अडथळे आले. बोगद्यात टाकण्यात येत असलेल्या पाईपचा वाकलेला भाग बाहेर काढण्यात आला. खराब झालेले ऑगर मशीन दुरुस्त करुन पुन्हा काम सुरु करण्यात आले. परंतु तांत्रिक बिघाडामुळे ऑपरेशन थांबवावे लागले. एनडीआरएफने कामगारांना बाहेर काढण्यासाठी मॉक ड्रिल केले.
25 नोव्हेंबर : ऑगर मशिन तुटल्याने 2 दिवस बचावकार्य ठप्प झाले. आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ञ अरनॉल्ड डिक्स यांनी सांगितले आहे की, आता ऑगरने ड्रिलिंग केले जाणार नाही आणि इतर कोणतेही मशीन मागवले जाणार नाही. बोगद्याच्या वरून उभ्या ड्रिलिंगची तयारी सुरु केली.
26 नोव्हेंबर : डोंगराच्या माथ्यावरून उभ्या खोदकामाला सुरुवात झाली. उभ्या ड्रिलिंग अंतर्गत डोंगरात माथ्यापासून खालपर्यंत मोठा खड्डा करून मार्ग तयार करायला सुरुवात करण्यात आली.
27 नोव्हेंबर : पहाटे 3 वाजता सिल्क्यरा येथून 13.9 मीटर ऑगर मशीन अडकले लांब भाग काढले. सायंकाळी उशिरापर्यंत ऑगर मशीनचे अडकलेला भाग ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आला. यानंतर रॅट मायनर्सने हाताने खोदकाम सुरू केले. रात्री 10 वाजेपर्यंत पाईपही 0.9 मीटरने पुढे ढकलण्यात आले. 36 मीटरचे व्हर्टिकल ड्रिलिंग करण्यात आले. दरम्यान, हवामान विभागाने उत्तराखंडमध्ये येलो अलर्ट जारी केला. 24 ते 48 तासात हलका पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली.
28 नोव्हेंबर : बचावासाठी बोगद्यात टाकण्यात आलेला पाईप कामगारांपर्यंत पोहोचला. एनडीआरएफच्या टीमने आणखी दोन मीटरपर्यंत पाईप टाकले आहे. रात्री 8.35 वा अडकलेल्या सर्व 41 कामगारांना बाहेर काढण्यात आले. काहींना आवश्यकतेनुसार रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले.