Latest

Uterine fibroids : गर्भाशयाला होणार्‍या फायब्रॉईडस्मध्ये वाढ

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कामाचा वाढता व्याप, वाढलेला तणाव आणि जीवनशैलीतील बदलांमुळे महिलांमध्ये गर्भाशयाच्या पिशवीला होणार्‍या विकारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गर्भाशयाच्या कॅन्सरखालोखाल फायब्रॉईडस्च्या आजाराचा दुसरा क्रमांक लागतो. सामान्य महिलांप्रमाणे गर्भवतींनाही याचा त्रास होत असून, प्रसूतीनंतर या गाठी नष्टही होतात. तर काही महिलांमध्ये याचे प्रमाण वाढत जाते. वयाच्या पस्तीशीनंतर ही समस्या जाणवत असून अगदी शेवटचा उपाय म्हणून गर्भाशयाची पिशवी काढण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. (Uterine fibroids)

शहरात अलीकडील काही वर्षांत गर्भाशयातील फायब्रॉईडस्ची समस्या 40 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येते. उपचारासाठी येणार्‍या 25 टक्के स्त्रिया फायब्रॉईडस्शी संबंधित तीव्र स्राव होणार्‍या मासिक पाळीची तक्रार घेऊन येतात. करिअर, उशिरा लग्न आणि उशिराने होणारी गर्भधारणा यासारख्या कारणांमुळे फायब्रॉईडस्मध्ये वाढ झाली आहे. लक्षणे जाणवताच त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि त्यावर उपचार करणे ही काळाची गरज आहे. फायब्रॉईडस् एकापेक्षा जास्त एखाद्या बी च्या आकारापासून ते खरबुजाच्या आकारापर्यंत वाढतात. यामुळे महिलांमध्ये अस्वस्थता निर्माण होणे, जास्त रक्तस्त्राव, नैराश्य, तणाव, भीती यांचाही सामना करावा लागतो.

फायब्रॉईडस्ची तपासणी कशी करतात?

योनीमार्गाची प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर फायब्रॉईडस्ची माहिती मिळते. काहीवेळा सोनोग्राफी करून याची तपासणी करावी लागते.
सोनोग्राफी- याच्या मदतीने फायब्रॉईडस् कुठे आहेत आणि किती आहे हे तपासण्यात येते एमआरआय – फायब्रॉईडस्चा (गाठी) आकार आणि त्यांची जागा तपासली जाते हिस्टरेस्कोपी- गर्भाशयाच्या मुखातून टेलिस्कोप गर्भाशयात नेत गर्भाशयाची तपासणी केली जाते

फायब्रॉईडस्ची लक्षणे अशी

सामान्य लक्षणांमध्ये मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव, ओटीपोटात वेदना, 7 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकणारी मासिक पाळी, रक्ताच्या गुठळ्या, वारंवार लघवीला होणे, मूत्राशयावर दाब येणे, गुदाशयात वेदना, कंबरदुखी, बद्धकोष्ठता, पोटात गोळा येणे यांचा समावेश होतो. मात्र, सर्वच स्त्रियांना लक्षणे जाणवतीलच असे नाही.

SCROLL FOR NEXT