पुणे : पुढारी वृत्तसेवा : ज्या प्रकारे राजकीय पक्षामध्ये युवा आघाडी, महिला आघाडी, विविध सेल असतात, त्या प्रकारे भाजपमध्ये युवा मोर्चा, महिला मोर्चांसह विविध मोर्चा आहेत. या मोर्चांमध्ये आता ईडी मोर्चाचा समावेश झाला आहे, अशी टिका काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी शनिवारी पुण्यात केली.
काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी बोलताना निरुपम म्हणाले, भाजपकडून विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये, विरोधात बोलणार्या नेत्यांना धमकावण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे. एखाद्या राजकीय पक्षामध्ये ज्या प्रकारे युवा आघाडी, महिला आघाडी असते. त्याप्रकेरे भाजपच्या विविध मोर्चांमध्ये आता ईडी मोर्चाचा समावेश झाला आहे. तर ईडी म्हणजे किरीट सोमय्या आणि किरीट सोमय्या म्हणजे ईडी हे आता सामान्य नागरिकही बोलू लागले आहेत, असेही ते म्हणाले.
आझाद दिशा भरकटवत आहेत
मोदी सरकारच्या कामांमध्ये अनेक त्रुटी आहेत. महागाई, बोरेजगारी, सामाजिक वैमनस्य यांसारख्या गंभीर प्रश्नावर कोणीही बोलत नाही. अशामध्ये केवळ राहुल गांधी मोदी सरकारवर बोलत आहेत. मोदी सरकारच्या कामाविरोधात काँग्रेस पक्ष एक मोहीम राबवत आहे, या मोहिमेचे नेतृत्व राहुल गांधी करत आहेत.
काँग्रेस 4 सप्टेंबर रोजी दिल्लीत महागाईवर हल्लाबोल रॅली काढणार आहे. तसेच ते 7 सप्टेंबरपासून भारत जोडो यात्रा काढणार आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सच्चा कार्यकर्त्यासारखे योगदान देणे गरजेचे होते. मात्र, ते पक्ष सोडून नेत्यांवर टीका करत कार्यकर्त्यांची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप निरुपम यांनी यावेळी केला.