Latest

जी-20 : सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वाला अमेरिकेचा पाठिंबा

Arun Patil

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : जी-20 परिषदेच्या निमित्ताने पहिल्यांदाच भारत दौरा करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची शुक्रवारी (दि. 8) पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत द्विपक्षीय बैठक झाली. 'चांद्रयान-3' मोहिमेच्या यशाची राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केलेली प्रशंसा, संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाला अमेरिकेने दिलेला पाठिंबा, खुल्या आणि मुक्त भारत प्रशांत क्षेत्रात नियमाधारित व्यवस्थेसाठी 'क्वाड'ची असलेली नितांत आवश्यकता, हे उभय नेत्यांच्या चर्चेतील ठळक मुद्दे होते.

दोन्हीही नेत्यांनी भारत-अमेरिकेचे सामरिक, आर्थिक तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य आणखी वृद्धिंगत करण्यावर सहमती दर्शविली.

जी-20 परिषदेसाठी शुक्रवारी सायंकाळी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे दिल्लीत आगमन झाले. केंद्रीय मंत्री जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंग यांनी विमानतळावर राजकीय शिष्टाचारानुसार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे स्वागत केले. या सोपस्कारांनंतर लगेचच राष्ट्राध्यक्ष बायडेन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 7, लोककल्याण मार्ग या शासकीय निवासस्थानी द्विपक्षीय बैठकीसाठी पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे जोरदार स्वागत केले. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये उभय देशांचे संबंध आणखी प्रगाढ करण्याबाबत तसेच जागतिकद़ृष्ट्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर 50 मिनिटे सविस्तर बातचित झाली.

या भेटीनंतर पंतप्रधान कार्यालयाने दोन्ही नेत्यांची सार्थक चर्चा झाल्याचे ट्विट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी 7 लोककल्याण मार्ग येथे बातचित केली. चर्चेत अनेक मुद्द्यांचा समावेश होता. यामुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध आणखी प्रगाढ होतील; तर पंतप्रधान मोदींनीदेखील ट्विट करून, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या स्वागताने आनंद झाल्याचे सांगितले. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या व्हाईट हाऊस कार्यालयातर्फेदेखील याच आशयाचे ट्विट करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी भारत आणि अमेरिकेच्या घनिष्ठ आणि द़ृढ भागीदारी अधोरेखित करताना राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे भारतात स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जून 2023 मध्ये झालेल्या ऐतिहासिक वॉशिंग्टन दौर्‍यामध्ये ज्या उपलब्धी साध्य केल्या त्यांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा उभय नेत्यांनी आढावा घेतल्याचे व्हाईट हाऊसतर्फे स्पष्ट करण्यात आले. या भेटीनंतर उभय देशांचे संयुक्त निवेदन जारी करण्यात आले.

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या या बैठकीमध्ये जीई जेट इंजिन खरेदी, सामरिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे मानले जाणारे प्रिडेटर ड्रोन यांच्या खरेदीबाबत बातचित झाली. या साहित्याच्या खरेदीची प्राथमिक चर्चा पंतप्रधान मोदींनी जूनमध्ये केलेल्या अमेरिका दौर्‍यामध्ये झाली होती. यासोबतच 5-जी आणि 6-जी स्पेक्ट्रम, नागरी आण्विक क्षेत्रातील प्रगती याचप्रमाणे आर्थिक सहकार्य या मुद्द्यांचाही चर्चेत समावेश होता. दक्षिण चीन समुद्रामध्ये चिनी दादागिरीला चाप लावण्यासाठी भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांनी 'क्वाड'ची स्थापना केली आहे. भारत प्रशांत क्षेत्रातील खुलेपणासाठी 'क्वाड'च्या आवश्यकतेबाबतही दोन्ही नेत्यांची बोलणी झाली. येत्या प्रजासत्ताक दिनाला (26 जानेवारी) 'क्वाड' देशांच्या राष्ट्रप्रमुखांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याच्या प्रयत्नात मोदी सरकार आहे.

दरम्यान, या भेटीनंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन हॉटेल 'आयटीसी मौर्य'कडे रवाना झाले. उद्या (दि. 9) ते जी-20 शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी, उद्या सकाळी ते राजघाट येथे जाऊन महात्मा गांधीजींच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतील. भारत दौर्‍यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन व्हिएतनाम दौर्‍यावर रवाना होणार आहेत. तत्पूर्वी, 'जी-20 परिषदेसाठी हॅलो दिल्ली, यावर्षी जी-20 परिषदेसाठी भारतात असणे आनंददायी आहे,' असे ट्विट राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केले.

संयुक्त निवेदनातील मुद्दे…

'युनो'च्या सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्वासाठी भारताला अमेरिकेचा पाठिंबा.
बाह्य अवकाश संशोधनामध्ये भागीदारी अधिक द़ृढ करण्याचा निर्धार.
भारतात जीई एफ-414 जेट इंजिन तयार करण्यासाठी वाटाघाटींचे स्वागत.
भारताने अमेरिकेकडून 31 जनरल अ‍ॅटॉमिक्स एमक्यू-9 बी ड्रोन आणि त्याच्याशी संबंधित उपकरणे खरेदी करण्यासाठी विनंती पत्र जारी.
पुरवठा साखळी सुरळीत करण्यासाठी उभय देशांची कटिबद्धता.
मायक्रोचिप तंत्रज्ञानावर भारतात संशोधन आणि विकासासाठी 300 दशलक्ष डॉलर गुंतवणुकीवर समाधान.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT