Latest

26/11 चा आरोपी तहव्वूर राणाच्या हस्तांतरणाला परवानगी

Arun Patil

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वूर राणाला भारताकडे सोपवण्याला अमेरिकेच्या न्यायालयाने गुरुवारी परवानगी दिली. या निर्णयामुळे मुंबई हल्ल्याच्या कटातील दोषींना शिक्षा देण्याच्या भारताच्या निर्धाराला आणखी बळ मिळाले आहे.

न्या. जॅकलीन शूलजिआन यांनी हा आदेश दिला आहे. या आदेशामुळे भारत आणि अमेरिकेतील हस्तांतर करार बहुपयोगी ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढील महिन्यात होणार्‍या अमेरिका दौर्‍याआधी आलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

या प्रकरणात भारताने 10 जून 2020 रोजी राणाच्या हस्तांतरणासाठी तात्पुरत्या अटकेची मागणी केली होती. या विनंतीला बायडेन प्रशासनानेही मान्यता दिली होती. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने या विषयावर अधिक भाष्य केले नसले, तरी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आणि भारतासोबत या क्षेत्रात संबंध द़ृढ करण्यासाठी अमेरिका कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे.

डेव्हिड कोलमन हेडली ऊर्फ दाऊद गिलानी आणि इतरांसोबत संगनमत करून मुंबईवर हल्ला करण्याच्या लष्कर-ए-तोयबाच्या कटाची आखणी व अंमलबजावणी केल्याचा आरोप तहव्वूर राणावर आहे. मुंबई हल्ल्याच्या कटात सहभागी झाल्याप्रकरणी व लष्कर-ए-तोयबाला मदत केल्याप्रकरणी शिकागो न्यायालयाने त्याला 2011 मध्ये दोषी ठरवले होते.

याच तहव्वूर राणाला आता भारताकडे सोपवण्यात येणार असून, आपल्या 48 पानी आदेशात न्यायालयाने म्हटले आहे की, भारत आणि अमेरिका यांच्यातील हस्तांतरण करारानुसार राणाचा ताबा दिला जावा. या प्रकरणातील सर्वसंबंधित कागदपत्रे पडताळून आणि सुनावणीत करण्यात आलेले युक्तिवाद ऐकल्यानंतर तहव्वूर राणा याच्यावरील गुन्हे गंभीर असल्याने त्याचे हस्तांतरण करण्यास परवानगी दिली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT