पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्न संशोधन केंद्रांमध्ये काम करत असलेल्या पीएच.डी. मार्गदर्शकांना त्यांच्याकडे असलेल्या रिक्त जागांची माहिती येत्या 31 जानेवारीपर्यंत अद्ययावत कराव्यात, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
विद्यापीठाचे उपकुलसचिव मुंजाजी रासवे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, संशोधन मार्गदर्शक ज्या महाविद्यालयात कार्यरत आहे, त्या महाविद्यालयात संबंधित विषय हा पदव्युत्तर पदवी स्तरावर शिकविला जात असेल, तरच संबंधित विषयात संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता असेल अन्यथा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध नसलेल्या महाविद्यालयातील संशोधन मार्गदर्शकांना आगामी पीएच. डी. प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही. संशोधन मार्गदर्शक ज्या महाविद्यालयात कार्यरत आहे, त्या मूळ महाविद्यालयात त्या विषयाचे संशोधन केंद्र नसेल, तर त्यांना दुसर्या संशोधन केंद्रात संशोधन मार्गदर्शक होता येणार नाही परंतु त्यांना नियमानुसार केवळ सहमार्गदर्शक म्हणून काम करता येणार आहे.
संशोधन मार्गदर्शक मूळ महाविद्यालयात संशोधन केंद्र नसल्याने इतर संशोधन केंद्रात कार्यरत आहेत, त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या विद्याथ्यांना पीएच. डी. पदवी घोषित होईपर्यंत ते मार्गदर्शन करतील. परंतु त्यांना नवीन विद्यार्थी घेता येणार नाहीत किंवा त्यांना आगामी पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही. ज्या संशोधन मार्गदर्शकांनी यापूर्वी त्यांच्याकडील रिक्त जागा अद्ययावत केल्या आहेत किंवा ज्या संशोधन मार्गदर्शकांकडे सद्यस्थितीत जागा रिक्त झाल्या आहेत किंवा ज्या संशोधन मार्गदर्शकांना नव्याने संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाली आहे.
अशा मार्गदर्शकांना पुनश्च किंवा नव्याने जागा अद्ययावत करायच्या आहेत, त्या संशोधन मागदर्शकांनी त्यांच्या लॉगीनमधून त्यांच्याकडील रिक्त जागा अद्ययावत कराव्यात. संशोधन केंद्रांनी त्यांच्या मार्गदर्शकांकडील रिक्त जागा प्रवर्गनिहाय ऑनलाइन पध्दतीने मान्यता द्यावी ही सर्व प्रक्रिया 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करावी असेदेखील स्पष्ट करण्यात आली आहे.