Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण

दिनेश चोरगे

विजयवाडा; वृत्तसंस्था : घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे आंध्र प्रदेशात विजयवाडा येथे शुक्रवारी अनावरण करण्यात आले. चौथर्‍यासह 206 फूट उंची असलेला हा पुतळा जगातील 50 सर्वात उंच पुतळ्यांच्या यादीत समाविष्ट झाला आहे.

विजयवाडा येथे उभारण्यात आलेल्या या पुतळ्याला 'स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टीस' असे नाव देण्यात आले असून, या पुतळ्याचा चौथरा 81 फूट उंचीचा आहे व त्यावर 125 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. चौथर्‍यासह या पुतळ्याची उंची 206 फूट आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दुसरा सर्वात उंच पुतळा हैदराबादेत असून, तेथील पुतळ्याची चौथर्‍यासह उंची 175 फूट आहे. मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी म्हणाले की, या भव्य पुतळ्याच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न आहे. सामाजिक न्यायाचे प्रतीक असणारा हा पुतळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.

ही आहेत पुतळ्याची वैशिष्ट्ये

– 18.81 एकर जागेवर हा पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याच्या समोरच्या बाजूला आकर्षक उद्यान तयार करण्यात आले आहे.
– पुतळ्यासाठी 404 कोटी 35 लाख रुपये खर्च आला आहे.
– या पुतळ्यासाठी 400 टन पोलादाचा वापर करण्यात आला.
– पुतळ्याच्या समोरच्या भागात छोटे तलाव बांधण्यात आले असून, तेथे संगीत कारंजे असेल.
– डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना दाखवण्यासाठी मोठ्या एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे.
– याशिवाय 2 हजार प्रेक्षक क्षमतेचे कन्व्हेन्शन सेंटर, 8 हजार चौरस फुटांचे फूड कोर्ट व मुलांना खेळण्यासाठी जागा उपलब्ध असेल.

SCROLL FOR NEXT