Latest

Heavy Rain : अवकाळी पावसाने 3 हजार हेक्टर पिकांचे नुकसान; अर्धापूर, नायगाव, भोकर तालुक्याचा समावेश

अनुराधा कोरवी

नांदेड; पुढारी वृत्त्तसेवा : रविवारी पहाटे पडलेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल ३००४ हेक्टरवरील बागायत आणि फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे. अर्धापूर, नायगाव आणि भोकर तालुक्यात नुकसान झाले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. ( Heavy Rain )

संबंधित बातम्या 

नांदेड शहर व जिल्ह्यात रविवारी पहाटे अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. ४ वाजता सुरू झालेला पाऊस ९ वाजेपर्यंत बरसत होता. या अवकाळी पावसाने पाच तालुक्यातील १२ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. लिंबगाव मंडळात रेकॉर्ड ब्रेक ९९ मि.मी. पाऊस झाला.

हवामान विभागाकडून रविवार, सोमवार, मंगळवार असे तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरवत अवकाळीने रविवारी पहाटे झोडपण्यास सुरुवात केली. तब्बल पाच तास पडलेल्या या पावसाने शहरातील नाले भरून वाहू लागले. तर रस्त्यावरदेखील पाणी साचले होते. सुरुवातीला हलक्या सरी बरसल्या. मात्र, यानंतर पावसाचा जोर वाढत गेला. विजांच्या कडकडाटासह पावसाने अक्षरशः झोडपून काढले.

रविवारी पहाटे झालेल्या पावसाने पाच तालुक्यातील बारा मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. यामध्ये नांदेड तालुक्यातील नांदेड शहर ६८ मि.मी., लिंबगाव ९९ मि.मी., तरोडा ८२. ३० मि.मी., नाळेश्वर ७०. ८० मि.मी., अर्धापूर तालुक्यातील अर्धापूर ७७. ५० मि.मी., दाभड ६९ मि.मी., कंधार तालुक्यातील उस्माननगर मंडळात ७६.३० मि.मी. पावसाची नोंद झाली. लोहा तालुक्यातील सोनखेड ७६.३० मि.मी., कलंबर ७६.३० मि.मी., शेवडी ७४ मि.मी. तर हदगाव तालुक्यातील तामसा आणि पिंपरखेड येथे प्रत्येकी ६५. ३० मि.मी. पावसाची नोंद झाली.

पुढे दोन दिवस काही ठिकाणी ३० ते ४० किमी. वेगाने वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. हा पाऊस तूर आणि हरभरा पिकासाठी नुकसानकारक ठरला असून गहू पिकासाठी लाभदायक मानला जात आहे. तर उसासाठी देखील हा पाऊस अत्यंत चांगला असून पुढील १५ दिवस आता उसाला पाणी देण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले.
किनवट तालुक्यात पिंपरी येथे वीज पडून एक म्हैस तर नांदेड तालुक्यातील रहाटी येथे एक बैल दगावला. याशिवाय मुदखेडमध्ये दोन शेळ्या दगावल्या आहेत. ( Heavy Rain )

SCROLL FOR NEXT