Latest

अस्थिर श्रीलंका (Video) : राष्ट्रपती भवनावर आंदोलकांचा ताबा, स्विमिंग पूलमध्ये डुबक्या, शाही किचनमध्ये जेवण, बेडरूममध्ये विश्रांती

मोहन कारंडे

कोलंबो; वृत्तसंस्था : श्रीलंकेतील राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवलेल्या आंदोलकांनी या निवासस्थानी चांगलीच मौजमजा केली. अजूनही ही मौज सुरू आहे आणि त्याचे फोटोज, व्हिडीओजही जगभर व्हायरल झाले आहेत. यात काही लोक राष्ट्रपती भवनातील स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा, डुंबण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. जगभरात यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी चक्क राष्ट्रपतींच्या खुर्चीवर बसून फोटो काढले, तर काही आंदोलक येथील शाही किचनमध्ये जेवतानाही दिसत आहेत. काही जणांनी राष्ट्रपतींच्या शयनकक्षातील बेडवर विश्रांतीचा आनंदही घेतला.

गेल्या तीन महिन्यांपासून राजकीय आणि आर्थिक अस्थैर्याचा सामना करत असलेल्या श्रीलंकेत आंदोलकांनी शनिवारी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या अधिकृत निवासस्थानावर ताबा मिळवला होता. त्यानंतर आज रविवारी येथे आंदोलकांना नोटांची लाखो रुपयांची बंडले आढळून आली आहेत. श्रीलंकेच्या चलनात 1.78 कोटी रुपयांची ही रोकड आहे. हा संपूर्ण पैसा आंदोलकांनी सैन्याकडे सोपवला आहे. अनेक भागांत संचारबंदी लोकांचे जत्थेच्या जत्थे राजधानी कोलंबोकडे येत आहेत. त्यामुळे एकूण येथे सर्वत्र अराजकाची स्थिती निर्माण झाली आहे. श्रीलंकेतील परिस्थिती पाहून पोलिसांनी अनेक भागात संचारबंदी लागू केली आहे.

या पाच कारणांमुळे श्रीलंका भुकेकंगाल

चुकीची धोरणे, भ्रष्टाचार आणि विचित्र निर्णयांची शिकार बनलेला श्रीलंका हा छोटेखानी देश सध्या भुकेकंगाल बनला आहे. पाच प्रमुख कारणांमुळे त्या देशाची अवस्था दयनीय झाली असून तेथे अराजक माजले आहे.

  • करकपात आली अंगलट : 2019 मध्ये, राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी कर कपातीचा खेळ खेळला, परंतु यामुळे अर्थव्यवस्थेला धक्का बसला. एका अंदाजानुसार, यामुळे श्रीलंकेच्या कर उत्पन्नात 30% घट झाली.
  • कर्जामुळे बिघडला खेळ : श्रीलंकेचे निर्यात उत्पन्न अंदाजे 12 अब्ज आहे, आयातीवरील खर्च सुमारे 22 अब्ज आहे, म्हणजे तिची व्यापार तूट 10 अब्ज आहे. यावरून त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कसा बेंडबाजा वाजला आहे याची कल्पना येऊ शकते.
  • दहशतवादी हल्ला, कोरोनाची लाट : एप्रिल 2019 मध्ये ईस्टर संडेच्या दिवशी कोलंबोमधील तीन चर्चवर दहशतवादी हल्ल्यात 260 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. दहशतवादी हल्ल्याने श्रीलंकेच्या पर्यटन उद्योगाचे नुकसान झाले.
  • दोन घराण्यांकडून चुकचुकाट : मैत्रीपाला सिरिसेना यांच्या अध्यक्षतेखालील श्रीलंका फ्रीडम पार्टी. दुसरा पक्ष श्रीलंका पोडुजाना पेरामुना पार्टी असून त्याचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे. या दोन्ही घराण्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचा बोर्‍या वाजवला.
  • रासायनिक खतांवर बंदी : राजपक्षे सरकारने सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली श्रीलंकेतील शेतीमध्ये रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापरावर बंदी घातली. हा निर्णय चुकीचा ठरला आणि धान्य उत्पादनात मोठी घट झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT