Latest

अर्ध्या महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात पिकांचे नुकसान

मोहन कारंडे

नाशिक/नगर/ पुणे, पुढारी वृत्तसेवा: मराठवाडा- विदर्भ भागांवर मंगळवारपर्यंत वादळी पावसाचे संकट आहे. ७ मार्च रोजी मराठवाडा तसेच विदर्भात गारपिटीची शक्यता आहे. सुरुवातीला केवळ उत्तर महाराष्ट्रापुरत्या मर्यादित असलेल्या अवकाळीच्या संकटाने आता निम्मा महाराष्ट्र व्यापला आहे. अवकाळीचे वातावरण ८ मार्चनंतर निवळेल, अशी माहिती पुणे हवामान विभागाने दिली आहे. दुसरीकडे, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागांतून सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे हाताशी आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे.

राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. नाशिक, बुलडाणा, पालघर, नगरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पाऊस झाला आहे. नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यांतील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले. बुलडाणा तसेच पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. बागायतदारांचे नुकसान झाले असून, बुलडाण्यातील गहू, हरभरा आणि कांदा पिकाला फटका बसला आहे. कांदा, पालेभाज्यांना बाजारात दर नसल्याने आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यात आता अस्मानी संकटाची भर पडली आहे.

धुळे जिल्ह्यात गारपीट; केळीला फटका

शिरपूर (जि. धुळे) तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गहू, हरभरा व इतर पिकांचे नुकसान झाले. हिंगोणीत केळीचे नुकसान झाले. दहिवदला गारपीट झाली. वरझडीत वीज कोसळल्याने २ बैलांचा मृत्यू झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT