ज्ञानेश्वर खुळे
विरगाव (नगर) पुढारी वृत्तसेवा: यंदा एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसासह गारपीटीने रब्बी हंगामाची वाताहत केली. नगदी पीक उन्हाळी कांद्याला यांचा सर्वाधिक फटका बसून कांद्याची प्रतवारीच बिघडली आहे. परिणामी बाजार भावात मोठी घसरण झाल्याने आर्थिक अरिष्टाच्या गर्तेत सापडलेल्या कांदा उत्पादकांना उत्पादन खर्चही मिळणे मुश्किल झाले आहे.
लाल कांद्याच्या तुलनेत उन्हाळी कांद्याची प्रतवारी चांगली मानली जाते. शेतकरी आणि व्यापारीही वर्षभराच्या साठवणुकीसाठी उन्हाळी कांद्याला प्राधान्य देतात, परंतु अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे कांद्यातील ओलसरपणा टिकून राहिल्याने त्याचा परिणाम प्रतवारीवर झाला. त्यातच बाजारभावात मोठी घसरण झाल्याने उत्पादन खर्चही भरुन येत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे.
उन्हाळी कांद्याची लागवड नाशिक, पुणे व अ.नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे. बाजारात उन्हाळी कांद्याची आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे. पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात दररोज 60 ते 70 ट्रक कांद्याची आवक सुरु असल्याची माहिती मिळाली. मागणीच्या तुलनेत आवक जादा असल्यामुळेही कांद्याचे बाजारभाव पडले आहेत.
घाऊक बाजारात कांद्याचे बाजारभाव प्रतिक्विंटल 500 ते 900 रुपये इतके आहेत. किरकोळ बाजारात हाच कांदा 20 ते 30 रुपये प्रति किलोने विकला जातो. शेतकरी ते ग्राहक या प्रवासात कांद्यातून घाऊक आणि किरकोळ व्यापारी मात्र फायद्यात असतात. शेतकरी आणि त्याचा कांदा मात्र मातीमोल होतो. उन्हाळी कांद्याला एकरी 50 हजारांपर्यंत खर्च येतो. हा सारा खर्च आणि वाहतुकीबरोबर बाजारपेठेतील खर्च विचारात घेता उत्पन्नापेक्षा खर्च अधिक सुरु आहे. कांदा विक्रीस पाठविणेही आता परवडत नाही. गेल्या साधारणतः तीन ते चार वर्षांपासून हीच परिस्थिती आहे.
कांदा पिकवूनही अनेक शेतकर्यांकडे साठवणुकीस जागा नाही. कांदा शेतात खराब होण्यापेक्षा मिळेल ते पदरात पाडून घेऊ, या अपेक्षेने बाजारपेठेत कांदा विक्रीसाठी गेलेल्या अनेक शेतकर्यांची घोर निराशा झाली. उन्हाळी कांद्याच्या मिळकतीवर पाहिलेली सारी स्वप्ने आता धुळीस मिळाल्याने चिंता वाढली आहे.
कोणत्याही शेती मालाला बाजारभाव नाहीत. कांदा आणि भाजीपाला पिकांची पुर्ण वाट लागली. जोडधंदा असलेल्या दुधावरचं सध्या शेतकर्यांचा चरितार्थ चालू आहे. निसर्ग कायमच शेतकर्यांना संकटात टाकतो. सरकारचेही शेतीप्रश्नाकडे पुर्ण दुर्लक्ष आहे. सत्ताधारी असो अथवा विरोधक हे सारेजण शेतकर्यांवर पोटतिडकीने बोलतात, परंतु हे सारे प्रेम पुतणा- मावशीचे आहे. मतांची बेगमी करणे एवढ्यासाठीच सर्व राज्यकर्त्यांनी शेतकर्यांचा वापर केला. शेतकर्यांचे प्रश्न मात्र कायमस्वरुपी टिकून आहेत.
– बाळासाहेब सूर्यभान अस्वले, वीरगाव (अकोले)