Latest

रावणगाव: शिवची आई मंदिराचा गाभारा पेटविला; मूर्तीचे नुकसान, अज्ञाताचा खोडसाळपणा

अमृता चौगुले

रावणगाव,पुढारी वृत्तसेवा: पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रावणगाव (ता. दौंड) येथील ग्रामदैवत व ग्रामस्थांच्या नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून ओळख असणाऱ्या शिवची आई मंदिरातील गाभारा सोमवारी (दि.१०) रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पेटविल्याने मंदिरातील मूर्तीचे जळून मोठे नुकसान होऊन विटंबना झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

मंगळवारी सकाळी काही भाविक भक्त देवीची पूजा करण्यासाठी आले असता वरील प्रकार लक्षात आला. देवीचा गाभारा भाविक भक्तांच्या सेवेसाठी चोवीस तास उघडा असल्याने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणा किंवा वेगळ्या भावनेतून देवीचे चोळी, पातळ तसेच छबिन्याचे साहित्य खाली फेकून आणि तेल डबा गाभाऱ्यात ओतून पेटविल्याने सर्व गाभारा जळून खाक झाला. यामध्ये देवीची मूर्ती पूर्णपणे जळून तडकल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या घटनेनंतर गावातील ग्रामस्थांनी मंदिर परिसरात धाव घेत संताप व्यक्त करत या खोडसळपणाचा निषेध केला.

पुणे – सोलापूर महामार्गावरील रावणगाव – मळद सीमेवर देवीचे हे जागृत ठाण असून जाणाऱ्या-येणाऱ्या भक्तांसाठी हे एक श्रद्धास्थान आहे. येथे दरवर्षी आषाढामध्ये मोठा उत्सव भरतो. बाहेरगावी प्रवास करताना अनेक भाविकभक्त येथील देवीचे दर्शन घेऊनच बाहेर पडतात. नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची अख्यायिका आहे. गाभाऱ्याच्या विटंबनाप्रकरणी ग्रामस्थांनी तातडीने बैठक बोलावून मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा निर्णय तातडीने घेतला. वरील घटनेबाबत पोलिसात फिर्याद देणार असल्याचे ग्रामस्थांनी या वेळी सांगितले.

SCROLL FOR NEXT