Latest

उत्तराखंड : दोन हिंदू बहिणींनी मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त दिले अनोखे गिफ्ट; वडिलांची इच्छा केली पूर्ण

मोनिका क्षीरसागर

काशीपूर, (उत्तराखंड) पुढारी ऑनलाईन : आजकाल देशाच्या काही भागात धार्मिक वादाने लोकांची शांतता हिरावून घेतली जात आहे. छोट्या-छोट्या गोष्टींवरून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वातावरणात ईदच्या पार्श्वभूमीवर धार्मिक सलोख्याचे एक आदर्श उदाहरण समोर आले आहे. दोन हिंदू बहिणींनी मुस्लिम बांधवांना चार बिघा जमीन भेट म्हणून देत ईदच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या दिवंगत वडिलांच्या इच्छेनुसाठी  या दोन हिंदू बहिणींनी मुस्लिम बांधवांना ईदचे हे अनोखे गिफ्ट देत, धार्मिक सलोख्याचा आदर्श घालून दिला आहे. दोन्ही विवाहित बहिणींच्या कुटुंबियांनी काशीपूर गाठून जागेचा ताबा ईदगाह कमिटीला दिला आहे. या घटनेची सध्या विविध माध्यमात खूपच चर्चा सुरू आहे.

देशातील अनेक भागात धार्मिक वादाच्या बातम्या लोकांची शांतता हिरावून घेत आहेत. छोट्या-छोट्या गोष्टींवरून लोक आमने-सामने येत आहेत, तर या दोन हिंदू भगिनींनी ईदच्या आदल्या दिवशी मुस्लिम बांधवांना भेटवस्तू देऊन समाजासमोर आदर्श ठेवला आहे. काशीपूर येथील ही जमीन दान दिल्यानंतर समितीने पाया खोदून कामही सुरू केले आहे. या जमिनीची बाजारभावाची किंमत दीड कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे. लाला ब्रजनंदन प्रसाद रस्तोगी यांच्या कुटुंबाची काशीपूर येथील ईदगाह मैदानाजवळ शेतजमीन आहे. या जमिनीवर इदगाहच्या सीमेला लागून क्रमांक ८२७ (१) आणि (२) अशी सुमारे चार बिघा जमीन आहे. हा भाग समाविष्ट केल्यावर ईदगाहचा आकार आयताकृती बनतो. ब्रजनंदन ही जमीन ईदगाहसाठी दान करण्यास तयार होते, परंतु ही जमीन त्यांच्या दोन मुली सरोज रस्तोगी आणि अनिता रस्तोगी यांच्या नावावर होती.

ईदगाहला जमीन देण्याबाबत विवाहित मुलींना विचारता येत नाही. विवाहित मुलींना ईदगाहला जमीन देण्यासही सांगू शकत नव्हते, त्यामुळे त्यांनी माजी खासदार सत्येंद्र चंद्र गुडिया यांच्याकडे आपला इच्छा सांगितली होती. ब्रजनंदन प्रसाद रस्तोगी यांचे ईदगाह समितीच्या अधिकाऱ्यांशी जवळचे संबंध होते. ते दरवर्षी ईदगाहसाठी देणगी देत ​​असतं. ईदगाह समितीला इतर माध्यमातूनही ते मदत करत असतं. ब्रजनंदन रस्तोगी यांचे २५ जानेवारी २००३ रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर हे प्रकरण थंड बस्त्यात गेले होते. मात्र हे कळताच त्यांच्या मुलींनी हा निर्णय घेतला.

वडिलांची इच्छा कळताच त्यांनी घेतला निर्णय

पुढे सरोज रस्तोगी आणि अनिता रस्तोगी या मुलींना वडिलांची इच्छा कळल्यावर त्यांनी जमीन दान करण्याचा निर्णय घेतला. भाऊ राकेश रस्तोगी यांच्या मदतीने समितीचे सदर हसीन खान यांच्याशी संपर्क साधून इदगाहला लागून असलेली जमीन दान करण्याची इच्छा व्यक्त केली. सध्या सरोजचे कुटुंब मेरठमध्ये तर अनिताचे कुटुंब दिल्लीत राहते. दोन्ही बहिणींच्या संमतीवरून सरोज यांचे पती सुरेंद्रवीर रस्तोगी आणि मुलगा विश्ववीर रस्तोगी आणि अनिता यांचा मुलगा अभिषेक रस्तोगी रविवारी काशीपूरला पोहोचले.

वडिलांच्या इच्छेचा केला आदर

सामाजिक कार्यकर्ते पुष्क अग्रवाल, राकेश रस्तोगी, इदगाहचे सदर हसीन खान यांच्या उपस्थितीत लेखापाल बोलावून जमिनीचे मोजमाप करून ईदगाह शेजारील जमीन समितीच्या ताब्यात देण्यात आली. दोन्ही बहिणींच्या कुटुंबीयांनी सांगितले की त्यांनी दिवंगत ब्रजानंदन रस्तोगी यांच्या इच्छेचा आदर केला आहे. त्याच्या या कृतीमुळे त्याच्या कुटूंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

काशीपूर शहर राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक : हसीन खान, सदर ईदगाह समिती

काशीपूर शहर हे राष्ट्रीय एकात्मतेचे उदाहरण आहे. येथे प्रत्येक सण एकत्र साजरा करण्याची परंपरा आहे. आमच्या बहिणी सरोज रस्तोगी आणि अनिता रस्तोगी यांनी ईदगाहच्या हद्दीपासून पश्चिमेकडे जाणार्‍या रस्त्याच्या विस्तारासाठी चार बिघा जागा दिली आहे. समस्त समाजाच्या वतीने मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि भविष्यातही सर्व धर्माचे लोक एकमेकांच्या सुख-दु:खात एकत्र राहतील अशी आशा आहे.

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT