Latest

Union Budget 2022 : पायाभूत सुविधांच्या वाढीला गती देणारे अंदाजपत्रक : नितीन गडकरी

नंदू लटके

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारामन यांनी आज संसदेत सादर केलेले अंदाजपत्रक देशातील आधुनिक पायाभूत सुविधांच्या वाढीला गती देणारे आहे. हे अंदाजपत्रक १३० कोटी भारतीयांचे जीवन अधिक सुसह्य करणारे आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.

देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच महामार्ग, रेल्वे, वीज, आरोग्य, शिक्षण आणि शेतीशी संबंधित महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांवर करण्यात येत असलेली गुंतवणूक ही मैलाचा दगड असल्याचे सिध्द होईल, असा विश्वास व्यक्त करून ना. गडकरी म्हणाले. २०२२-२३ मध्ये रस्ते परिवहन मास्टर प्लॉनला अंतिम रुप देण्यासोबतच शहरी भागात सार्वजनिक वाहतूक-परिवहनमध्ये येणार्‍या बदलाला गती देणे, शून्य इंधन नीतीच्या निर्णयांमुळे शहरी क्षेत्राला विशेष गती मिळेल.

अर्थमंत्री सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात डोंगराळ राज्यांमध्ये रोप वेसह पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यावर जोर दिला आहे. याअंतर्गत ६० किमी लांब ८ रोप वे बनविण्याची योजना आखण्यात आली आहे. रोप वे मार्गातून नवीन पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. यामुळे कोट्यवधी लोकांसाठी वाहतूक सुव्यवस्थित होईल आणि माल वाहतूक खर्चात कपात होईल, असा विश्‍वासही गडकरी यांनी व्‍यक्‍त केला.

सन २०२२ मध्ये २५ हजार किमी रस्ते निर्माण पूर्ण करण्यासोबतच प्रदूषण रोखण्यासाठी अनेक शहरांमध्ये ई-वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या योजनेचे आपण स्वागत करीत आहोत. शहरांमध्ये बॅटरी अदलाबदल करण्याच्या धोरणावर भर दिला जाईल. त्यामुळे प्रदूषणापासून दिलासा मिळेल, असेही ते म्‍हणाले.

शेतकरी, महिला आणि युवकांकडे अधिक लक्ष देणार्‍या या अंदाजपत्रकात पीएम गती शक्ती योजनेच्या माध्यमातून विकासावर अधिक भर देण्यात आला आहे. सरकारच्या धोरणांमुळे देशभरात प्राकृतिक शेतीला प्रोत्साहन मिळेल. तसेच पीपीपी मॉडेल अंतर्गत योजना आणल्या जातील. त्यामुळे शेतकर्‍यांपर्यंत डिजिटल आणि आधुनिक तंत्रज्ञान पोहोचेल व त्याचा शेतकर्‍यांना फायदा होईल, असेही ना. गडकरी म्हणाले.

हेही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT