पुढारी ऑनलाईन डेस्क : U-19 T20 World Cup : सलामीवीर श्वेता सेहरावतच्या नाबाद 92 धावा आणि कर्णधार शेफाली वर्माच्या 16 चेंडूत 45 धावांच्या जोरावर भारतीय महिला संघाने अंडर-19 टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाचा सात गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी 167 धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे टीम इंडियाने धडाकेबाज सुरुवात करून 3 विकेट्स आणि 16.3 षटकात 170 धावा करून आरामात पूर्ण केले.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाची कर्णधार ओलुहले सियोने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 166 धावा केल्या. सायमन लॉरेन्सने 44 चेंडूत 61 धावांची खेळी केली. त्याचवेळी मॅडिसन लँडसमॅनने 32 आणि अॅलेन्ड्री रेन्सबर्ग हिने 23 धावा केल्या. भारताकडून शेफाली वर्माने 2, तर शबनम आणि पार्श्वी चोप्राने प्रत्येकी एक विकेट घेतली.
167 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाच्या सलामीवीर शेफाली वर्मा आणि श्वेता सेहरावत यांनी सुरुवातीपासूनच द. आफ्रिकेच्या गोलंदाजीवर जोरदार आक्रमण केले. दोघींनी पहिल्या विकेटसाठी 7.1 षटकात 77 धावांची भागीदारी केली. शेफालीने 16 चेंडूत 9 चौकार आणि एका षटकारासह 45 धावा केल्या. शेफालीला मियाने स्मित हिने ई. रेन्सबर्गच्या हाती झेलबाद केले. यानंतर श्वेताने जी. त्रिशा आणि सौम्या तिवारीच्या साथीने मजबूत भागीदारी रचल्या आणि संघाला 21 चेंडू बाकी असताना विजय मिळवून दिला. श्वेताने 161.40 च्या स्टाईक रेटने 57 चेंडूंत 20 चौकारांच्या मदतीने नाबाद 92 धावांची धमाकेदार खेळी साकारली. ती प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी ठरली.