Latest

३५२ दिवसांत ‘Hardest Geezer’ तब्‍बल १६ हजार किलोमीटर धावला!

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पृथ्‍वीवरील एक व्‍यक्‍ती ३५२ दिवसांत तब्‍बल १६ हजार किलोमीटर धावला आहे, ही गोष्‍ट आता आख्यायिका राहिलेली नाही. हार्डेस्‍ट गीझर या टोपण नावाने ओळखल्‍या जाणारा इंग्‍लंडचा धावपटू रस कुक याने हा भीम पराक्रम वास्‍तवात केला आहे. त्‍याने ३५२ दिवसांमध्‍ये आफ्रिकेतील वाळंवट, घनदाट जंगले आणि प्रवासातील अनेक आव्‍हानांना ताेंड देत रविवार, ७ एप्रिल रोजी अविश्‍वसनीय लक्ष्‍य साध्‍य केले. रस कूक हा  संपूर्ण आफ्रिका खंड धावणारा जगातील पहिला व्‍यक्‍ती ठरला असल्‍याचे वृत्त 'अल जझिरा'ने दिले आहे. ( UK's 'Hardest Geezer' completes challenge to run length of Africa )

कोण आहे रस कुक?

रस कुक हा इंग्‍लंडचा धावपटू आहे. काही वर्षांपूर्वी त्‍याच्‍या मित्राने त्‍याला हाफ मॅरेथॉन स्‍पर्धेत सहभाग हाेण्‍यास सांगितले. धावण्‍याची आवड असणार्‍या कुकने मित्राचा सल्‍ला ऐकला. त्‍याने हाफ मॅरेथॉनमध्‍ये भाग घेतला. यानंतर त्‍याने कधीच मागे वळून पाहिले नाही. २०१९ मध्‍ये कुकने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. त्‍याचे आशिया खंडातील धावणे चर्चेचा विषय ठरले. यानंतर ६६ दिवसात ७१ मॅरेथॉन जिंकत नवा पराक्रमही त्‍याने आपल्‍या नावावर केला.

Hardest Geezer : संपूर्ण आफ्रिका खंडच पालथा घातला…

यानंतर कुक याने संपूर्ण आफ्रिका खंड धावण्‍याचा निर्धार केला. २२ एप्रिल २०२३ रोजी दक्षिण आफ्रिकेतील सर्वात दक्षिणेकडील टोक केप अगुल्हास येथून त्‍याने धावणे सुरु केले. यानंतर विविध देशांमधील व्हिसा समस्या, आरोग्यासह चोरट्यांचे आव्हानांना तोंड देत त्‍याने ७ एप्रिल रोजी ट्युनिशिया येथे आपली साहसी धावण्‍याची मोहिम पूर्ण केली. आफ्रिका खंडातील १६ देशांमध्‍ये अविश्वसनीय १६ हजार किलोमीटर ( ९ हजार मैल) धावण्‍याचा भीमपराक्रम त्‍याने आपल्‍या नावावर केला आहे.

कशासाठी धावतोय रस कुक?

रस कुक त त्याच्या YouTube चॅनल आणि Instagram हँडल, @hardestgeezer द्वारे त्‍याच्‍या धावण्‍याविषयी माहिती देतो. द रनिंग चॅरिटी, सँडब्लास्ट (सहरावी निर्वासितांना मदत करणे) आणि वॉटरएड (स्वच्छ पाण्याच्या जागतिक प्रवेशास प्रोत्साहन देणे) या धर्मादायी संस्‍थांना आर्थिक मदत उभी करणे हे आपले लक्ष्‍य असल्‍याचे तो सांगतो. त्यांच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, त्‍याने आतापर्यंत विविध देशांमधील धावून £430,080 (अंदाजे रु. 4.50 कोटी) मिळाले आहेत. एकूण £1,000,000 (अंदाजे रु. 10 कोटी) उभारण्याची त्याचा मानस आहे. त्‍याने आफ्रिकेत १६ हजार किलोमीटर धावत दोन स्वतंत्र धर्मादाय संस्थांसाठी $870,000 जमा केले आहेत.

सारं काही सहन करत तो धावत राहिला….

आफ्रिकेत १६ हजार किलोमीटर धावण्‍याचा पराक्रम पूर्ण झाल्‍यानंतर रस कूक म्‍हणाला की, "मी थोडा थकलो आहे. २४० दिवसांत हा प्रवास पूर्ण करण्याचे माझा मानस होता. विविध देशात विविध आव्‍हानांचा सामना करत ३५२ दिवसांमध्‍ये १६ हजार किलोमीटर धावण्‍याचे लक्ष्‍य पूर्ण झाले."

अंगोलामध्ये लुटले, नायजेरियात पाठदुखी, अल्‍जेरियन दुतावासाने थांबवले…

कूक आणि त्‍याच्‍या टीमला आफ्रिकेतील अंगोलामध्ये बंदुकीच्या धाक दाखवत चोरट्यांनी लुटले. यावेळी त्‍याच्‍या'कडे असणार्‍या पैशाबरोबरच पासपोर्ट, मोबाईलसह प्रवासात लागणार्‍या जीवनावश्‍यक वस्‍तूंची चोरी झाली. यानंतर नायजेरियात पाठदुखीमुळे त्‍याला काही काळ विश्रांती घ्‍यावी लागली. तरीही त्‍याने माघार घेतली नाही. यानंतर अल्जेरियात प्रवेश करण्यासाठी व्हिसा नसल्यामुळे त्‍याला येथे काही काळ मुक्‍काम करावा लागला. दररोज धावणे हे शारीरिक आणि मानसिकदृष्‍ट्या आव्‍हानात्‍मक असल्‍याचे सांगत कूक म्‍हणतो की, आफ्रिकेत ६८ दिवसामध्‍ये इस्तंबूल ते वर्थिंग पर्यंत सुमारे 3,000 किमी (1,860 मैल) किलोमीटर तो सलग धावला.

ट्युनिशियात समर्थकांकडून स्‍वागत

रविवार, ७ एप्रिल रोजी ट्युनिशियातील बिझर्टे येथे रस कुक याने आपली १६ हजार किलोमीटर धावण्‍याचा पराक्रम पूर्ण केला. त्‍याचे उत्तर ट्युनिशियातील भूमध्यसागराच्या खडकाळ मैदानावर समर्थकांनी उत्‍स्‍फूर्त स्‍वागत केले.

प्रवासाचा अनुभव शब्‍दात सांगणे कठीण

कूक म्‍हणतो की, "कुटुंब आणि मैत्रिणीला न पाहता ३५२ दिवस दररोज रस्त्यावर धावणे. हे शब्दात सांगणे फार कठीण आहे," ही धाव पूर्ण करत त्‍याने धर्मादायी संस्‍थांसाठी 690,000 पौंड ($870,000) पेक्षा जास्त रक्कम जमा केले. पश्चिम सहारामधील विस्थापित लोकांना मदत करणार्‍या सँडब्लास्ट संस्‍थेसाठीही त्‍याने रक्‍कम जमा केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT