आधारकार्डाची गरज दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आता सरकारी योजना, बँका, अनुदाने… सर्वत्र आधारकार्डाची गरज असते. अशा परिस्थितीत तुमचे आधारकार्ड हरवले आणि तुमचा डेटा चोरीला गेला, तर त्याचा गैरवापर होण्याचा धोका वाढतो. आधार क्रमांक फसवणूक करणार्या लोकांच्या हातात गेला तर धोका आणखी वाढतो. तुमच्या बँक खात्यातून सर्वच्या सर्व रक्कम साफ केली जाऊ शकते. बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रातील फसवणूक टाळण्यासाठी यूआयडीआयएने कार्डधारकांना लॉकिंग आणि अनलॉकिंग करण्याची सुविधा देऊ केली आहे. डेटा सुरक्षा आणि गोपनीयता मजबूत करण्यासाठी आधारकार्डधारक यूआयडीएआयच्या माध्यमातून आधारकार्ड लॉक आणि अनलॉक करू शकतात. एकदा ही सुविधा उपयोगात आणल्यानंतर फसवणूक करणारे तुमच्या आधारकार्डचा दुरुपयोग करू शकत नाहीत.
एखाद्याचे आधारकार्ड लॉक करण्यासाठी, कार्डधारकांकडे 16 अंकी व्हर्च्युअल आयडी आवश्यक आहे. आधारकार्ड लॉक करण्यासाठी हे आवश्यक आहे. तुमच्याकडे 16 अंकी व्हर्च्युअल आयडी नसल्यास, तुम्ही 1947 या क्रमांकावर एसएमएस पाठवून तो मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 1947 क्रमांकावर गॉट ओटीपी असे टाईप करून एसएमएस पाठवावा लागेल. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी लॉक यूआयडी असे टाईप करून 1947 या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक लॉक होईल आणि हरवल्यास त्याचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होणार नाही.
जर तुम्हाला आधारकार्ड पुन्हा अनलॉक करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून एसएमएस पाठवावा लागेल. त्यासाठी तुम्हाला व्हर्च्युअल आयडी लागेल. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून गॉट ओटीपी स्पेस आणि व्हर्च्युअल आयडीचे शेवटचे सहा अंक टाईप करून 1947 क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. आता ओटीपी आल्यानंतर पुन्हा 1947 क्रमांकावर अनलॉक यूआयडी स्पेस आणि व्हर्च्युअल आयडीचे शेवटचे 6 अंक असणारा मेसेज करावा लागेल. त्यानंतर तुमचे आधारकार्ड अनलॉक होईल.
– प्रियांका जाधव