Latest

आदित्यला मुख्यमंत्री म्हणून तयार करण्याचा शब्द फडणवीसांनी दिला होता : उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

अनुराधा कोरवी

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : आदित्य ठाकरेंना मी मुख्यमंत्री पदासाठी तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीला जातो, असा शब्द भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दिला होता. त्यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटारडे ठरविण्याचा प्रयत्न केला आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केल्या आहेत.

आमच्यातील वितुष्टाची सुरुवात कुठून झाली हे लोकांना माहिती आहे. राष्ट्रवाद आणि हिंदुत्व या मुद्द्यांमुळे आम्ही एकत्र होतो. मग तरीही भाजपने आधी आमच्याशी युती तोडणे आणि नंतर शिवसेना फोडण्याचे कृत्य का केले, असा प्रश्न ठाकरे यांनी केला.

माझ्या वडिलांच्या काळात असे ठरले होते की भाजप देश सांभाळेल, आम्ही राज्य सांभाळू. ठरल्याप्रमाणे सगळे व्यवस्थित चालू होते. मात्र बाळासाहेब 2012 मध्ये गेले तेव्हा मोदी मला येऊन भेटले. जेव्हा ते 2014 मध्ये पंतप्रधान झाले तेव्हा एका स्वप्नाची पूर्तता झाल्याची भावना निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर ते वेगळे वागू लागले. बाळासाहेब गेल्यानंतर त्यांनी आम्हाला वापरून फेकून देण्याची रणनीती अवलंबिली.

अमित शाहंनी नाक रगडले होते!

दरम्यान, मातोश्रीमध्ये आम्ही ज्या खोलीला मंदिर मानतो ती बाळासाहेबांची खोली आहे. त्याच खोलीत अमित शाह बाळासाहेबांच्या फोटोसमोर नाक रगडायला आले होते, असा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला.

दक्षिण मध्य मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ अ‍ॅण्टॉप हिल येथे आयोजित सभेत ते बोलत होते. फडणवीस यांनी मला सांगितले कि, मी आदित्यला चांगला तयार करतो आणि नंतर अडिच वर्षानंतर त्याला मुख्यमंत्री करू. पण मी म्हटले काहीतरी बोलू नका, तो लहान आहे. आमदार म्हणून तो त्याची कारकिर्द सुरु करीत आहे. त्याला तुम्ही तयार करा, पण लगेच मुख्यमंत्री म्हणून त्याच्या डोक्यात काही घालू नका. मग तो मुख्यमंत्री झाला तर तुम्ही सर्व ज्येष्ठ नेते त्याच्या हाताखाली काम करणार का, असा सवाल करताच फडणवीस यांनी आपण अडिच वर्षांनंतर दिल्लीत जाणार असल्याचे सांगितले, या दाव्याचा उध्दव यांनी पुनरुच्चार केला. ठाकरे म्हणाले, फडणवीस मला भ्रमिष्ठ म्हणाले. पण मी भ्रमिष्ठ आहे की नाही ते जनता ठरवेल.

SCROLL FOR NEXT