Latest

उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची घेतली भेट; तर्कवितर्कांना उधाण

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणावरून पेटलेले वातावरण आणि राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकालांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. सोमवारी पुस्तक प्रकाशनानिमित्त ठाकरे-पवार एकाच व्यासपीठावर होते. त्यानंतर चोवीस तासांत झालेल्या या दुसर्‍या भेटीमुळे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

सायंकाळी उद्धव ठाकरे 'सिल्व्हर ओक'वर दाखल झाले. यावेळी जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत हेही उपस्थित होते. सिल्वर ओकवर जवळपास पाऊणतास खलबते झाली. आजची बैठक ही कौटुंबिक स्वरूपाची होती. यात राजकीय विषयावर फार चर्चा झाली नाही, अशी माहिती आव्हाड यांनी बैठकीनंतर दिली. शिवाय, राजकीय बैठक नसल्याने काँग्रेसच्या नेत्यांना आमंत्रण नव्हते, असेही याबाबतच्या प्रश्नावर बोलताना सांगितले.

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालात महायुतीशी संबंधित पॅनल आणि आघाड्यांची सरशी झाली आहे. तर, महाविकास आघाडीशी संबंधित विशेषतः ठाकरे गट आणि शरद पवार गटाची पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट झाली का, असा तर्क लढविला जात आहे. तर, दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी धारावी पुनर्विकासाविरोधात आघाडी उघडण्याचा इशारा दिला होता. त्यावर, शरद पवार यांनी यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आजच्या बैठकीत अदानी समूहाकडील धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबतही चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT