Latest

Uddhav Thackeray | मोदींनी खिडकी उघडली? पुन्हा भाजपसोबत जाणार का?; या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग सोमवारी प्रसिद्ध झाला. खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत यावे. त्यांची स्वप्ने निश्चित पूर्ण होतील, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केले होते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत कदापि जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मोदी यांनी महाराष्ट्राचा घात केलाय. त्यांच्याबरोबर हातमिळवणी कदापि शक्य नाही, असा विश्वासही त्यांनी जनतेला दिला.

उद्या जर गरज पडली तर शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्यांचे सरकार बनेल काय? या प्रश्नाचे उत्तर देताना ठाकरे यांनी म्हटले आहे की, तुम्ही पिक्चरचे सेट पाहिलेत कधी? बाळासाहेबच मला युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये घेऊन गेले होते. तिथे छान सेट बनवले होते. जसे आपल्या नितीन देसाई यांनी बनवले होते. त्यात अशा भिंती, खिडक्या असतात आणि त्या खिडकीतून पाठी बघितलं तर टेकू लावलेले असतात, आत काहीच नसतं. अशी खिडकीचा काय उपयोग?.

'मी त्या फटीतून जाणार नाही'

खिडकी उघडली की दरवाज्याची फट उघडली आहे? गरज पडली तर आम्ही एकत्र येऊ शकतो, यावर बोलताना ठाकरेंनी, मी फटीतून जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

मोदी यांनी म्हणे शिवसेनेविषयी गोड बोलणे सुरु केले. हा त्यांचा खोटेपणाआहे. आता त्यांच्याबरोबर कदापि जाणार नाही, असेही ते पुढे म्हणाले.

'माझ्या महाराष्ट्रातं, अभिमानाचं, स्वाभिमानचं, अस्मितेचं एक वेगळंच मंदिर बांधतोय. त्यामुळे मला असल्या फटींची आणि दरवाजांची गरज नाही. मी माझ्या महाराष्ट्राची लढाई लढतोय. देशाची लढाई लढतोय. लोकांचा आशीर्वाद मला पाहिजे आणि ही लढाई फक्त माझी नाही ती जनतेचीही नाही. कारण नाहीतर हे महाराष्ट्राला खतम करतील, जे दिसतंय. महाराष्ट्र कोणत्याही परिस्थितीत मी खतम होऊ देणार नाही," असे त्यांनी आश्वासन दिले आहे.

सरकार बदलेल का?

तुम्हाला किती आत्मविश्वास आहे की सरकार बदलेल? या प्रश्नाचे उत्तर ठाकरेंनी, नक्कीच बदलेल असे दिले आहे. बदलावंच लागेल आणि एकटा महाराष्ट्र हे घडवू शकतो. महाराष्ट्राने जर महाविकास आघाडीचे ४८ खासदार जिंकून दिले तर तिकडेच हे खाली येतील आणि बाकी देशात तर तुम्ही बघताच आहात. वातावरण आहेच. आज गुजरातमध्ये क्षत्रिय समाज यांच्यावरोधात रस्त्यावर उतरला आहे, असा दावाही त्यांनी केला.

मोदी- शहांनी शिवसेना फोडली

मोदी- शहांनी शिवसेना फोडली आणि महाराष्ट्र लुटल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपकडून फसवलो गेल्याची भावना आजसुद्धा आहेच. आणि विश्वासघात…! मी विश्वासघातक्यांना कधी मदत करु शकत नाही. आणि सत्तेसाठी जर काही आम्ही तडफडत असतो तर अख्ख्या देशात जेव्हा भाजपचे दोनच खासदार होते आणि भाजप जेव्हा हिंदुत्ववादी नव्हता. गांधीवादी समाजवादाकडे होता. देशाच्या राजकारणात शिवसेना आणि भाजप अस्पृश्य होती. दोन खासदार असलेल्या पक्षाबरोबर शिवसेनेने युती केली होती. कोणाच्या ध्यानीमनी होतं का…की यांना पंतप्रधानपद दिसेल?, असेही ठाकरेंनी म्हटले आहे.

पक्ष गेला नाही

तुमचा पक्ष गेला म्हणजे निवडणूक आयोगाने तुमच्याकडून पक्ष काढून घेतला, असे विचारताच ठाकरेंनी कुठे गेला? नाही गेला… असे उत्तर दिले. निवडणूक आयोगाला तो अधिकारच नाहीये. हे मी मानायलाच तयार नाही, असे ते म्हणाले.

निवडणूक आयोगाने घटनाबाह्य काम केले आहे. हे घटनात्मक काम नाही, अशा शब्दांत त्यांनी आयोगाने टीकास्त्र सोडले.

 'सोरेन, केजरीवालांना तुरुंगात टाकणे ही हुकूमशाही'

हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकणे ही हुकूमशाही असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. लोकांनी निवडून दिलेले केजरीवाल दिल्लीत चांगले काम करीत होते. त्यांनी भाजपसारख्या जगातल्याच नव्हे तर पूर्ण आकाशगंगेतल्या सगळ्यात मोठ्या पक्षाला धोबीपछाड दिला. ७० पैकी त्यांचे दोन-पाच निवडून आले असतील तर असतील. हेमंत सोरेन यांच्यासारख्या आदिवासी नेत्याने भाजपला धोबीपछाड दिला. त्यांना तुम्ही जमिनीवर हरवू शकत नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT