तारौबा (त्रिनिदाद) ; वृत्तसंस्था : अंगक्रीश रघुवंशी आणि राज बावा यांच्या शतकाच्या जोरावर चार वेळच्या चॅम्पियन भारताने 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक (U19 World Cup) सामन्यात युगांडासारख्या कमकुवत संघाला 326 धावांनी धूळ चारत 'ब' गटात अव्वल स्थान मिळवले. हा भारताच्या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे. भारताने यापूर्वी स्पर्धेतील आपल्या पहिल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेला 45 धावांनी पराभूत केले आणि नंतर आयर्लंडला 174 धावांनी नमविले.
पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या भारताने बावा (108 चेंडूंत नाबाद 162 धावा) आणि सलामी फलंदाज रघुवंशी (120 चेंडूंत 144 धावा) यांच्या शतकांच्या जोरावर 5 बाद 405 धावसंख्येपर्यंत मजल मारली. यानंतर भारताने युगांडाचा डाव 19.4 षटकांत 79 धावसंख्येवर संपुष्टात आणत एकतर्फी विजय नोंदवला. भारताचा सामना उपांत्यपूर्व फेरीत 29 जानेवारीला बांगला देशशी होईल ज्यामुळे कर्णधार यश धुलसह कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूंना सावरण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.
रघुवंशी आणि बावाने तिसर्या विकेटसाठी 206 धावांची भागीदारी रचत भारताच्या विजयाचा पाया रचला. दोघांनीही युगांडाच्या गोलंदाजांविरुद्ध चौफेर फटकेबाजी केली. रघुवंशीने 22 चौकार आणि चार षटकार मारले तर, बावाने आपल्या खेळीत 14 चौकार व आठ षटकार मारले. रघुवंशी 38 व्या षटकात माघारी परतला त्यानंतर बावाने आक्रमक खेळ केला. युगांडाच्या गोलंदाजांचा भारतीय फलंदाजांसमोर निभाव लागला नाही. युगांडाकडून कर्णधार पास्कल मुरुंगी सर्वात यशस्वी गोलंदाज राहिला. त्याने 72 धावांत तीन विकेट मिळवले.
19 वर्षांखालील विश्वचषक (U19 World Cup) इतिहासात भारताची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. स्पर्धेतील भारताची सर्वोच्च धावसंख्या ही 3 बाद 425 अशी आहे जी त्यांनी 2004 मध्ये स्कॉटलंडविरुद्ध केली होती. जागतिक विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावे आहे. त्यांनी 2002 मध्ये केनिया विरुद्ध 6 बाद 480 धावसंख्या उभारली होती. बावाची नाबाद 162 धावांची खेळी 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील भारताकडून सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे. बावाने सलामी फलंदाज शिखर धवनला मागे टाकले. त्याने 2004 मध्ये स्कॉटलंडविरुद्ध नाबाद 155 धावांची खेळी केली होती.
भारताच्या 406 धावसंख्येचा पाठलाग करताना युगांडाची सुरुवात चांगली झाली नाही आणि संघाने चार षटकाच्या 17 धावांवर आपले तीन विकेट गमावले. फॉर्मात असलेला गोलंदाज राजवर्धन हंगर्गेकरने (2/8) काकुरू व असाबा यांना बाद केले तर, जलदगती गोलंदाज वासू वत्सने देखील एक विकेट घेत त्याला साथ दिली. स्पिनर आणि कार्यवाहक कर्णधार सिंधूने (19 धावांत चार विकेट) यानंतर रोनाल्ड ओपियोला बाद केले.