Latest

सोनाई दूध संघाचे दोन टँकर फोडले ; बारा जणांवर गुन्हा दाखल

अमृता चौगुले

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा :  दूध दरवाढीच्या आंदोलनाच्या नावाखाली गुरुवारी सायंकाळी व रात्री सोनाई दूध संघाचे दुधाने भरलेले दोन टँकर अडवून त्यांच्यावर दगडफेक करीत चालकांना दमदाटी व मारहाण करून चावी काढून घेत सील तोडून दूध रस्त्यावर सोडून देण्यात आले. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी 12 अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. टँकरचालक किरण सुखदेव मोरे (रा.बावडा, ता. इंदापूर) यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, इंदापूर शहराच्या हद्दीतील पुणे- सोलापूर महामार्गावर अकलूज पुलाजवळच्या सेवा रस्त्यावर दुधाने भरलेला सोनाई डेअरीचा टँकर (एम. एच. 42 टी. 4100) घेऊन जात असताना अचानक सहा ते सात 22 ते 24 वयोगटातील युवकांनी तोंडाला रुमाल बांधून चालकाच्या केबिनमध्ये घुसून बळजबरीने चावी काढून घेतली.

मारहाण करून पॅन्टच्या खिशातील पाचशे रुपयेही काढून घेतले. खाली जाऊन पाठीमागील टँकरचे सील तोडून त्यातील पाच ते सहा हजार लिटर दूध खाली सोडून दिले. यात सोनाई डेअरीचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, तर दुसरा टँकर (एम. एच.42 टी. 4000) हा चालक शरद बबन घाडगे (रा.चांडगाव,ता. इंदापूर) घेऊन जात अताना भाटनिमगाव ते काळेवाडी नंबर एक येथील दूध भरून जात असताना पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर राजवडी पूल चढत असताना काही लोकांनी मोटरसायकल आडव्या घालून टँकरचे सील तोडून सात हजार लिटर दूध रस्त्यावर सोडून दिले. एक लाख 75 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा तपास इंदापूर पोलिस करीत आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT