पुणे : पुढारी वृत्तसेवा : सिंगापूरहून पुण्यात आलेले दोन प्रवाश्यांपैकी एकजण करोनाबाधित आढळला आहे. त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवाल आल्यानंतर करोना विषाणूचा व्हेरियंट कोणता आहे, याची स्पष्टता होईल. मात्र, या व्यक्तीला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.
पॉझिटिव्ह असलेली व्यक्ती कोथरूड परिसरातील महिला आहे. आरोग्य विभागाकडून पुण्यातील लोहगाव विमानतळावर प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी सिंगापूर येथून आलेल्या दाम्पत्याची तपासणी केली असता, त्यापैकी महिला कोरोना बाधित असल्याचं समोर आलं आहे. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, सध्या बीएफ7 या नवीन व्हेरियंटने डोकेदुखी वाढवली आहे. त्यामुळे बाधित व्यक्तीला लागण झालेल्या विषाणूचा प्रकार कोणता याची तपासणी करण्यासाठी नमुने पाठविण्यात आले आहे.