Latest

पुणे: पोलिस ठाण्यापासून ससूनपर्यंत कोयताधारी टोळक्याचा राडा, बंडगार्डन पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल

अमृता चौगुले

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शुक्रवारी (दि.24) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास हडपसर परिसरातील दोन टोळक्यांनी एकमेकांवर कोयते उगारून थेट ससून रुग्णालयातच राडा घातला. पोलिस आणि ससून रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक यांच्यासमोरच हा प्रकार घडला. त्यामुळे कोयताधारी गुन्हेगारांना कोणाचे भय आहे की नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे. पोलिस ठाण्यापासून ससून रुग्णालयापर्यंत येत असताना रसत्याने देखील दोन गटांनी राडा घातला. ससूनच्या आवारातील कोयता,चाकूच्या फ्रिस्टाईल मारामारीचा प्रकार सिसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. सावनसिंग काळुसिंग जुन्नी ( 30,रा.दापोडी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, बंडगार्डन पोलिसांनी राजसिंग युवराजसिगं जुन्नी, कुलदीपसिगं लाखनसिगं जुन्नी, लाखनसिगं जर्मनसिगं जुन्नी, युवराजसिंग जर्मनसिगं जुन्नी, जलसिगं जर्मनसिगं जुन्नी, तोपनसिगं जर्मनसिगं जुन्नी, जसपालसिगं जपानसिगं जुन्नी (रा. पाटील इस्टेंट झोपडपट्टी, शिवाजी नगर व पिंपरी चिंचवड) आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर पोलीस शिपाई राजू घुलगुडे (वय 29) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजसिंग युवराजसिंग जुनी, कुलदीपसिंग लाखनसिंग जुन्नी, लाखनसिंग जर्मनसिंग जुन्नी , युवराजसिंग जर्मनसिंग जुन्नी, जलसिंग जर्मनसिंग जुन्नी, तोपनसिंग जर्मनसिंग जुन्नी, जसपालसिंग जपानसिंग जुन्नी, सावनसिंग काळुलिंग जुन्नी, जितेंद्र सिंग टाक, दीपमाला सागरसिंग जुन्नी, लक्ष्मीकौर अर्जुनसिंग भोंड, सपना कौर टाक, अज्जोकौर टाक, पानकौर टाक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सावनसिंग जुन्नी त्यांचे नातेवाईक त्यांचा मोठा भाऊ सागरसिंग जुन्नी यास उपचारासाठी ससून हॉस्पीटल वार्ड नं.40 येथे उपचारासाठी घेऊन आले होते. यावेळी फिर्यादीची बहिण लक्ष्मी अर्जुनसिगं भोंडसोबत त्यांच्या समाजाच्या महिला सपना कौर टाक, अज्जोकौर टाक, पानकौर जुन्नी या वादविवाद करत होत्या. फिर्यादी त्यांना समजाविण्यासाठी गेले असता तेथे असलेले राजसिंग युवराज सिंग जुन्नी, कुलदीपसिंग लाखनसिंग जुन्नी यांनी बेकायदेशीर जमाव जमवला. यानंतर ते फिर्यादी यांना मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून आले.

आरोपी कुलदीप सिंग याने त्याच्याकडील धारदार हत्याराने फिर्यादीच्या डोक्यावर वार केला. मात्र, तो वार फिर्यादी यांनी चुकविला. त्यानंतर जितेंद्रसिंग टाक यास राजसिंग युवराजसिंग जुन्नी याने हातातील लोखंडी कड्याने मारहाण केली. फिर्यादी यांच्या भावाचा मुलगा सुखबीरसिंग जुन्नी यास काही आरोपी मारहाण करत असताना फिर्यादी त्यास वाचविण्यासाठी धावत गेले, तेव्हा युवराजसिंग लाखन याने धारदार हत्याराने फिर्यादीवर वार केला. हा वारही फिर्यादी यांनी चुकविला.

नागरिकांवरही उगारली हत्यारे –

हा प्रकार पाहून रुग्णांचे नातेवाईक आणि सुरक्षा रक्षकांची पळापळ झाली. सुरक्षा रक्षक, तेथील नागरिक फिर्यादी आणि सुखबीर यांना वाचविण्यासाठी पुढे धाऊन आले. मात्र, आरोपींनी धारदार हत्यार लोकांचे दिशेने उगारुन कोई इसको बचाने को सामने आयेगा, तो उसको जानसे मार डालुंगां असे म्हणत दहशत पसरवली. त्यावेळी जमलेले लोक घाबरून सैरावैरा पळुन गेले. यानंतर लाखनसिंग जुन्नी व त्याच्यासोबत असणाऱ्या इतरांनी शिवीगाळ करुन पोलीसांत तक्रार केल्यास तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत पळ काढला.

हडपसरमध्ये दोन गटांमध्ये मारामारी झाल्यावर त्यातील जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी समोरील गटातील व्यक्ती तेथे दाखल झाले. त्यांच्यात वादविवाद झाल्यावर प्रकरण मारामारीपर्यंत गेले. याप्रकरणी पोलिसांच्यावतीनेही एक तक्रार बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. तर हडपसरमध्येही उपचारासाठी दाखल झालेल्या जखमीच्यावतीने तक्रार दाखल करण्याचे काम सुरु आहे.
– संतोष पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT