अमरावती : पुढारी वृत्तसेवा – चांदूरबाजार-अमरावती मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघेजण ठार झाले आहेत. मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. शनिवारी, २० एप्रिल रोजी दुपारी बोराळा गावाजवळ हा अपघात झाला. मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव शरद जनबंधू असे असून ते पोलीस स्टेशन ब्राह्मणवाडा थळी येथे चालक पदावर कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, चांदूरबाजार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रेल्वे क्रॉसिंग पासून काही अंतरावरच दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही दुचाकीवरील चालक घटनास्थळीच ठार झाले. बुलेटस्वार पोलीस कर्मचारी शरद जनबंधू हे दुचाकी क्रमांक एम एच २७ डीजी ५३३२ गाडीने आपल्या घरी अमरावती येथे जात होते. दरम्यान विरुद्ध दिशेने येणाऱ्या टीव्हीएस दुचाकी क्रमांक एम एच २७ सीडी ३३८५ गाडीने त्यांना धडक दिली.
अन्य एक जण हा चांदूरबाजार तालुक्यातील देशखेड येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. नागरिकांच्या मदतीने अपघातातील मृतकांना रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच रस्त्याच्या मधोमध असलेल्या दोन्ही दुचाकींना रस्त्याच्या बाजूला करण्यात आले.