पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे पोलिस तसेच सामाजिक संस्थांच्या मदतीने 'गुड टच, बॅड टच'चा उपक्रम सुरू असताना शाळेतील एका मुलीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फुटली. या प्रकरणी आता दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानिमित्ताने राबविला जात असलेला 'गुड टॅच, बॅड टच'चा उपक्रम प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे.
पिडीत मुलगी ही सध्या 16 वर्षाची असून ती पुण्यातील एका शाळेत शिक्षण घेते. मध्यंतरी कोंढव्यात शिक्षकाने आपल्याच विद्यार्थीनी बरोबर गैरकृत्य केल्याची घटना घडल्यानंतर त्याच पार्श्वभूमीवर शाळांमध्ये जनजागृतीपर 'गुड टच, बॅड टच'च्या अनुषंगाने माहिती देण्याचे काम सुरू होते. यावेळी एका 16 वर्षाच्या मुलीने आपल्यासोबत देखील गैरकृत्य झाल्याच्या प्रकाराला वाचा फोडली. या प्रकरणात सामाजिक संस्था आणि कोंढवा पोलिसांनी तिची आपबिती ऐकून घेत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.
पहिल्या गुन्ह्यानुसार, पिडीत मुलगी ही 2011 मध्ये एल. के.जीला असल्यापासून ते इयत्ता आठवी पर्यंत तिला दोघांनी वासनेची शिकार बनवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार या निमित्ताने उघड झाला आहे. या प्रकरणी तिने दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय आहिरे (28, रा. कोंढवा) आणि सोनु बबन व्हावळे (26) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तिच्या व आरोपींच्या घरी कोणी नसताना घडला.
तर दुसर्या गुन्ह्यात पिडीतेच्या ओळखीच्या महिलेच्या भावाने देखील तिचा विनयभंग केल्याच्या प्रकाराची माहिती दिल्याने राहुल गायकवाड (28, रा. वारजे माळवाडी) नावाच्या एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे करीत आहेत.