Latest

‘ट्विटर’ चीनच्या दावणीला? दोघा भारतीयांना काढून मस्क यांचे पहिले पाऊल

मोहन कारंडे

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अ‍ॅलन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याचा करार केला तसे 'चीनला आता फायदा होईल', असे ट्विट 'न्यूयॉर्क टाईम्स'च्या एका बातमीदाराने केले होते. 'अ‍ॅमेझॉन'चे मालक जेफ बेझोस यांनी त्यावर रिट्विट केले आणि ही बाब चिंताजनक ठरेल, असे मत व्यक्त केले होते. या घटनेला 7 महिने उलटले आहेत आणि मस्क यांनी अखेर ट्विटर विकत घेतले आहे. आता चीनला अनुकूल ठरेल, अशी 'ट्विटर'ची धोरणे आखली जातील, असा तज्ज्ञांचा कयास आहे.

मालकी येताच मस्क यांनी सीईओ पराग अग्रवाल आणि कायदेशीर धोरण प्रमुख विजया गड्डे या दोघा मूळ भारतीयांना काढून टाकले. चीनच्या दिमतीला हजर होण्यासाठी मस्क यांनी टाकलेले हे पहिले पाऊल मानले जाते. मस्क यांच्या टेस्ला कंपनीसाठी चीन ही दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. 2019 मध्ये, टेस्लाला चीनमध्ये आपल्या संपूर्ण मालकीचा कार कारखाना सुरू करण्याची परवानगी मिळाली. टेस्ला ही चीनमध्ये अशी पहिली परकीय कंपनी ठरली. यापूर्वी, जनरल मोटर्स, फोक्सवॅगन, फोर्ड आणि टोयोटा या जगातील मोठ्या कार कंपन्यांना चीनमध्ये त्यांचे कारखाने सुरू करण्यासाठी स्थानिक चिनी कंपन्यांशी भागीदारी करावी लागली होती. 2022 च्या पहिल्या तिमाहीत, टेस्लाने चीनमधून 4.65 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 35,340 कोटी रुपयांची कमाई केली. टेस्लाच्या एकूण कमाईपैकी 24.8 टक्के उत्पन्न चीनमधून आले. टेस्लाच्या इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या बॅटरी चीनकडून पुरविल्या जातात. शिनजियांगमध्ये टेस्लाचे शोरूम आहे. थोडक्यात मस्क हे शी जिनपिंग यांच्या उपकारांच्या ओझ्यात पुरते दबलेले आहेत. चीनशी असलेल्या संबंधांमुळे मस्क यांनी ट्विटरच्या धोरणात बदल केल्यास चीनला ट्विटरच्या माध्यमातून प्रचाराचा मार्ग मोकळा होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अ‍ॅलन मस्क आणि चीनचे संबंध जुने आणि घनिष्ट आहेत. शी जिनपिंग आणि चीनचे कौतुक करताना मस्क यांच्या लेखणीतील शाई संपत नाही. 1 जुलै 2021 रोजी मस्क यांनी केलेले हे ट्विट… जणू ते चीनचे पर्यटन राजदूतच आहेत. मस्क म्हणतात, 'चीनची आर्थिक प्रगती अद्भुत आहे. विशेषत: पायाभूत सुविधेच्या क्षेत्रात तर केवळ नेत्रदीपक… तुम्ही स्वत: चीनला भेट द्या आणि आपल्या डोळ्यांनी बघा…'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT