Latest

किल्ले रायगडावर तुतारी निशाणी छत्रपतींना समर्पित

स्वालिया न. शिकलगार

नाते 

स्वाभिमानी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी तुतारी ही संघर्षासाठी प्रेरणा देणारी शक्ती ठरेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज किल्ले रायगडावर व्यक्त केला. यावेळी पक्षाच्या तुतारी या निशाणीला छत्रपतींना समर्पित करण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार राजेश टोपे, आमदार फौजीया खान, आमदार अनिल देशमुख, आमदार सुमनताई पाटील, खासदार वंदना चव्हाण, आमदार जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, सुरेश टोकरे, माजी आमदार अनिल भाऊ तटकरे, मेहबूब शेख, सुलक्षणा सलगर, साधनाताई घाणेकर, राखीताई जाधव, महाड तालुका अध्यक्ष मुदस्सीर पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदार शरद पवार म्हणाले, केंद्रातील सत्ताधारी राज्याराज्यात तसेच जनतेमध्ये तंटा निर्माण करण्याचे काम करीत आहेत. हातातील सत्ता सामान्यांच्या हिताकरता न वापरता सुरू असलेले काम बदलण्यासाठी सत्तेमध्ये परिवर्तन करावे लागेल, असे सांगितले. छत्रपती शिवरायांनी रयतेचे हिंदवी स्वराज्य निर्माण केले होते. देशात अनेक राजे होऊन गेले. मात्र छत्रपतींनी निर्माण केलेला आदर्श आजही प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. स्वाभिमानी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी पक्षाची निशाणी तुतारी प्रेरणा देणारी शक्ती ठरेल, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

पक्षाच्या आजपासून पुढील भविष्यकाळात सर्वांच्या साथीने त्यागातून आणि कष्टातून आपण यश संपादन करू, असा विश्वास त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना देऊन पुढील वाटचालीसाठी सर्वांनी एकजूटपणे कार्यास लागावे असाच संदेश दिला.

तत्पूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये वयाच्या ८४ व्या वर्षी वयोवृद्ध योद्धा पुन्हा एकदा संघर्षासाठी उभा राहिला असल्याचे सांगितले. त्यांचे वय महत्त्वाचे नसून त्यांची दुर्गम इच्छाशक्ती व ईर्ष्या तरुणांना ताकद देणारी असल्याचे मत व्यक्त केले. सर्व समाजाला बरोबर घेऊन आपल्याला या पक्षाचे काम खेडोपाडी पोहोचवायचे असून त्यासाठी शरद पवारांनी रणशिंगे फुंकले असल्याचे सांगितले.

या लढ्यात महाराष्ट्रातील रयतेने संपूर्ण साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जयंत पाटील यांनी तुतारीचे शिवकालीन महत्व विशद करत ही तुतारी देशभर राज्य करेल, असा विश्वास व्यक्त केला. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर शरद पवार यांनी त्यांच्या काळात केल्याचे सांगत पवार यांनी शेतकरीसह महिला वर्गसाठी कार्य केले आहे, हे अद्याप विसरता येणार नाही, असे सांगितले.

खासदार अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवरायांनी राजदंड धर्मगुरूंच्या हातात न देता धर्मसत्ता व राजसत्ता समानतेने खांद्याला खांदा लावून रयतेसाठी काम केल्याचे मत व्यक्त केले. तुतारी ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची प्रतीक असून राज्यातील विविध उद्योग गुजरातला जात असताना येथील शासनकरते गप्प का? असा सवाल त्यांनी केला.

महाराष्ट्राचा सातत्याने होणारा अपमान केंद्र सरकार करत असताना आता पेटून उठणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे तुतारी महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणजे तुतारी स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून या राज्याची जनता आता शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढण्यास सिद्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार फौजीया खान यांनी छत्रपती शिवरायांनी राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांना नतमस्तक होताना जिजाऊ मासाहेब नसत्या तर आजचे हे स्वराज्य निर्माण झाले नसते, असे सांगून सर्वांनी रयतेच्या राजासमोर नतमस्तक होण्याचे आवाहन केले. अत्यंत अल्पावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांना मिळालेल्या संकेतानुसार, मोठ्या संख्येने आज किल्ले रायगडावर जिल्ह्यातून आणि राज्यातून प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले होते.

या कार्यक्रमाचा मुख्य सोहळा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभेवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. याप्रसंगी पक्षाची असलेली निशाणी खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रियाताई सुळे जितेंद्र आव्हाड राजेश टोपे यांनी छत्रपतींच्या चरणी समर्पित केली. सकाळपासूनच किल्ले रायगडावर देशभक्तीपर गीतांची गाणी सुरू होती. युवा नेते महबूब शेख, साधनाताई घाणेकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर 'वाजवा तुतारी गाढा गद्दारी', 'तुमचे आमचे नाते काय जय भवानी जय शिवराय' या घोषणांनी किल्ले रायगड दुमदुमून गेला. पक्षाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी राजसद्रेवरच या झालेल्या प्रमुख कार्यक्रमानंतर पक्षाचे चिन्ह आणि ध्वज फडकावून आपला आनंद साजरा केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT