Latest

तुळजापूर : श्री तुळजाभवानी मातेचा सोन्याचा मुकुट, मंगळसूत्र गायबप्रकरणी गुन्हा नोंद

दिनेश चोरगे

तुळजापूर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्तिदेवता श्री तुळजाभवानी मातेच्या ऐतिहासिक, प्राचीन काळातील एक किलो वजनाचा सोन्याचा मुकुट व 12 पदरांच्या 11 पुतळ्या असलेले मंगळसूत्र गायबप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दागिने गायब असल्याचा अहवाल सोळा सदस्यीय दागदागिने तपासणी समितीने नुकताच जिल्हाधिकार्‍यांना सादर केला होता. केवळ मुकुटच नाही, तर तुळजाभवानी देवीच्या जामदारखान्यात असलेल्या शेकडो वर्षे जुन्या, दुर्मीळ दागिन्यांच्या वजनात कमालीची तफावत आढळून आली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी दिले होते. त्यानुसार आज सोमवारी पोलिस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणात नेमके दोषी कोण आहेत. हे कळू शकले नाही. मात्र दागिन्यांच्या पेटीतील मुकूट बदलून दुसरा कोणी ठेवला त्याला मदत कुणी केली हे स्पष्ट झालेले नाही. मात्र तत्कालीन प्रशासकीय अधिकारी, धार्मिक व्यवस्थापक, मंदिराचे महंत, सेवेकरी या प्रकरणात दोषी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान या घटनेमुळे राज्यासह परराज्यातील भाविकांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे.

SCROLL FOR NEXT