पुणे, पुढारी वृत्तसेवा: गेल्या काही दिवसांपासून श्री मार्तंड देवस्थान जेजुरीच्या सात विश्वस्तांच्या निवडीवरून ग्रामस्थांनी आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर धमार्दाय आयुक्तांनी विश्वस्तांची केलेली निवड ही घटनेनुसार केली आहे. तसेच नवनियुक्त विश्वस्त राजकीय पक्षाशी निगडीत असल्याचा आरोप चुकीचा असल्याचा दावा नवनियुक्त विश्वस्त मंडळाने पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी श्री मार्तंड देवस्थानचे नवनियुक्त अध्यक्ष पोपटराव खोमणे, मंगेश घोणे व डॉ. राजेंद्र खेडेकर, अॅड.विश्वास पानसे, अभिजित देवकाते आणि अॅड. पांडुरंग थोरवे उपस्थित होते.
नवनियुक्त विश्वस्त राजकीय पक्षाशी आणि बाहेरील असल्याचा आरोप खोडून काढला आहे. पोपटराव खोमणे, मंगेश घोणे व डॉ. राजेंद्र खेडेकर हे मूळ जेजुरी गावचे रहिवासी आहेत. अॅड. विश्वास पानसे व अभिजित देवकाते परिसरातील निवासी आहेत. अॅड. पांडुरंग थोरवे हे पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व अनिल सौंदडे हे उद्योगपती आहेत.
देवस्थानच्या विश्वस्तपदासाठी तब्बल 479 जणांनी अर्ज केले होते. त्यातील 95 अर्ज बाद झाले आणि सुमारे 300 पेक्षा जास्त जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. विश्वस्तांना त्यांच्या मुलाखतीमध्ये विविध क्षेत्रातील प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये सामाजिक विषयांसोबतच मंदिर व्यवस्थापन, दैनंदिन दिनचर्या, पूजा-अर्चा, श्री खंडोबा दैवत याविषयी माहिती, आपत्कालीन व्यवस्थापन आणि अनेक प्रश्न विचारले. त्याला सगळ्या विश्वस्तांनी सक्षमपणे उत्तरे दिली. विश्वस्त राजकीय पक्षाशी निगडित असावा किंवा नसावा, या संदर्भात घटनेमध्ये अशी कोणतीही तरतूद नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
श्री मार्तंड देवस्थान जेजुरी या ठिकाणी विश्वस्त हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच हिंदू धर्मातील, त्याचप्रमाणे पुरुष किंवा स्त्री असावा एवढेच स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी स्थानिकत्वाचा कोणताही मुद्दा नाही. सन 2012 च्या घटना दुरुस्ती मध्ये पुणे किंवा सासवड बार असोसिएशन चा एखादा पदाधिकारी विश्वस्त म्हणून असावा, असे स्पष्ट नमूद आहे. त्यामुळे या सर्व नियमात बसणारेच विश्वस्त म्हणून निवडले गेले आहेत, असा दावा विश्वस्त मंडळाने केला आहे.
श्री क्षेत्र खंडोबा मार्तंड देवस्थान हे अवघ्या महाराष्ट्रात नव्हे तर जगभरातील भाविकांचे दैवत आहे. या नियुक्तीमुळे सेवेकरी, खांदेकरी, पुजारी, गुरव इत्यादी कोणाच्याही दैनंदिन कामकाजात बाधा येत नाही. सध्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे श्री मार्तंड देवस्थान जेजुरी या क्षेत्राबद्दल विनाकारण चुकीचा संदेश समाजात पसरत आहे. इतकेच नव्हे तर भक्तनिवासच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन सुरू असल्यामुळे भक्तनिवास येथे येणार्या भाविक आणि कर्मचारी वर्गामध्येही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असा आरोप विश्वस्तांनी केला आहे.